चंद्रपूर : दीड महिन्याच्या बाळाच्या श्वसननलिकेत अडकलेली सेफ्टी पिन काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. चंद्रपूरच्या वरोरा शहरातील मडावी कुटुंबात हा प्रकार घडला आहे. या घटनेने पुन्हा एकदा लहान मुलांची काळजी महत्वाची असल्याचं समोर आलं आहे. अनेकदा आपण अजाणतेपणी लहान मुलांच्या बाबतीत वेगवेगळे पर्याय वापरले जातात. हीच गोष्ट या प्रकरणात महागात पडली आहे.
ब्रॉनकोस्कोपीच्या माध्यमातून सेफ्टी पिन बाहेर काढण्यात डॉ. मनीष मुंदडा यांना यश मिळालं आहे. डॉ. मनीष मुंदडा यांनी यशस्वी शल्यक्रिया केली आहे. लहान मुलांच्या कान-नाक-घशा संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टररांनी यावेळी केली आहे. एका लहानशा चुकीमुळे रियांश आणि त्याच्या आई-वडील एका मोठ्या दिव्यातून जावं लागल आहे.
२१ नोव्हेंबरला सकाळी मालिश करतांना नाक साफ करण्यासाठी रियांश मडावी या चिमुकल्या बाळाच्या आजीने नाकात सेफ्टी पिन टाकली. मात्र अनावधानाने ती पिन नाकातून घशात आणि घशातून श्वसननलिकेत गेली आणि बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वरोरा शहरात राहणाऱ्या मडावी कुटुंबाने आणि त्यांच्या घरमालकाने तातडीने त्या बाळाला जवळच्या रुग्णालयात नेले मात्र ती सेफ्टी पिन श्वासनलिकेत अडकल्यामुळे त्याला चंद्रपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला.
श्वसननलिकेत अडकलेली ही सेफ्टी पिन बाळाच्या जीवासाठी धोकादायक ठरली असती. मात्र चंद्रपुरातील प्रसिध्द नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ.मनीष मुंदडा यांनी अतिशय काळजीपूर्वक ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून ही सेफ्टी पिन बाहेर काढली. मुख्य म्हणजे जीवाशी आलेल्या या प्रसंगातून बाळ सुखरूप बचावले असले तरी डॉक्टरांनी लहान मुलांच्या कान-नाक-घश्यात अशा वस्तू न टाकण्याचे आवाहन केले आहे.