Cidco Diwali Bonus 2023 : दिवाळी निमित्ताने खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो. नवी मुंबई येथील सिडको प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 50 हजार रुपयांचा दिवाळी बोनस दिला आहे. बोनस जाहीर झाल्यानंतर सिडको कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून, पेढे वाढून आनंद साजरा केला.
दिवाळीनिमित्त सिडको प्रशासनाने सिडको कर्मचाऱ्यांना तब्बल ५० हजार रुपयांचा बोनस जाहीर केलाय. महामंडळांमध्ये हा सर्वाधिक बोनस असून सिडकोच्या या निर्णयाचे सिडको कर्मचारी संघटनेने स्वागत केले आहे. सिडको प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्व सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून सिडको कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केलाय.
ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये (Diwali Bonus) भरघोस 20 टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 18 हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये 20 टक्के वाढ झाली असून 21 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसेच आशा सेविकांना यंदा 6000 रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस 20 टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी वर्गाची दिवाळी गोड झाल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून (Kalyan Dombivali Municipal Corporation) आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 16 हजार 500 रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यामध्ये वाढ झाली असून 18 हजार 500 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे.