कोकण रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी सुस्साट

Konkan Railway Update : कोकण रेल्वे मार्गावर इतिहास घडला आहे. पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी सुस्साट निघाली. गुरुवारी कोकण रेल्वेवर दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजरला इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले.  

Updated: Jan 28, 2022, 10:32 AM IST
कोकण रेल्वे मार्गावर पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी सुस्साट title=

मुंबई : Konkan Railway Update : कोकण रेल्वे मार्गावर इतिहास घडला आहे. पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनावर गाडी सुस्साट निघाली. गुरुवारी कोकण रेल्वेवर दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजरला इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले. (Diva - Ratnagiri Passenger train is first time run on electric engine)  त्यामुळे आता बोगद्यातील धुरातून प्रवाशांची सुटका होण्यास मदत झाली आहे.

रत्नागिरी ते रोहा दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणीही यशस्वी झाली होती. त्यानंतर मालगाडी विद्युत इंजिनावर धावत होत्या. आता प्रवासी गाडी विद्युत इंजिनावर सुरु करण्यात यश आले आहे. दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर ही विद्युत इंजिनावर धावली. त्यामुळे प्रदूषणमुक्त पर्व कोकण रेल्वेवर सुरु झाले आहे.

कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून कोळसा आणि डिझेलवर धावत होती. तसेच कोकण रेल्वे मार्गावर केवळ डिझेलवर चालणारे इंजिन जोडून एक्सप्रेस चालवल्या जात होत्या. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत होती. काहीवेळा तांत्रिक अडचणी आणि मर्यादा यायच्या. आता यातून सुटका झाली आहे.  

गुरुवारी दिवा - रत्नागिरी पॅसेंजरला wcam3 हे इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आली. प्रथमच इलेक्ट्रिक इंजिन जोडून गाडी धावत असल्याने या गाडीचे स्वागत करण्यासाठी रेल्वेप्रेमी उपस्थित होते. मात्र, कोणताही गाजावजा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आला नाही. साधी गाडीही सजविण्यात आलेली नव्हती, त्यामुळे रेल्वे प्रवाशांतून तीव्र नाराजी दिसून आली.

गुरुवारी पहिल्या इलेक्ट्रिक इंजिन पॅसेंजरला जोडून चालविण्यात आली. ही चाचपणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता यापुढे सर्व गाड्या या कोकण रेल्वेवर इलेक्ट्रिक इंजिनावर धावणार आहेत. त्यामुळे डोंगर कपारीतून निसर्ग सानिध्यातून धावणाऱ्या कोकण रेल्वेमुळे आता प्रदूषण होणार नाही. त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचणार नाही. बोगद्यामध्ये धुरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. त्यातून आता सुटका होणार आहे.