मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र यात मतभेद असल्याचे दिसून येते. कारण एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत तयार राहण्याचे निर्देश दिलेले असताना, सरकारमधील उर्वरित दोन पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.
टास्क फोर्स, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिलेले की, नियमांचे कडक पालन होणार नसेल, तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा. मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यासाठी त्यासंदर्भातली SOP तयार करावी, असाही निर्णय बैठकीत झाला.
मात्र पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही रेड सिग्नल दाखवला आहे. राज्याला लॉकडाऊन परवडणार नाही, असं मत मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केलेलं. तर दुसरीकडे सरकारमध्ये कुणाचीही लॉकडाऊन लावण्याची मानसिकता नाही, असं वक्तव्य मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातली रेकॉर्डब्रेक वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री लॉकडाऊन लावण्याच्या विचारात असताना उरलेल्या मित्रपक्षांनी मात्र त्याला विरोध केला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारमध्येच मतभेद असल्याचे आता उघड झाले आहे.