Dhule News: चूक कोणाची शिक्षा कोणाला, 10 वर्षीय मुलाच्या मृत्यूने हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त

Dhule Boy Electic Shocked : अर्शद आपल्या मित्रांबरोबर खेळत होता, आणि कोणाला काही कळायच्या आतच त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या घटनेने त्याचे मित्रही घाबरले

Updated: Jan 19, 2023, 05:42 PM IST
Dhule News: चूक कोणाची शिक्षा कोणाला, 10 वर्षीय मुलाच्या मृत्यूने हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे :  महावितरण कर्मचाऱ्यांच्या (MSEB Employee) गलथान कारभारामुळे एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे धुळ्यात एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होतेय, तर महावितरणाविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. धुळे शहरातील गफूर नगर भागातील ही धक्कादायक घटना आहे. 

काय आहे नेमकी घटना
गफूर नगर भागात विजेच्या खांबाला (Electric Poles) स्पर्श केल्याने अर्शद अहमद अशफाक मोमीन या दहा वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना सीसीव्हीत (CCTV Footage) कैद झाली आहे. अर्शद हा घराजवळ बसला होता. तिथे आसपासच त्याचे काही मित्र-मैत्रिण खेळत होते. काही वेळाने अर्शद उठून एाक मैत्रिणीशी काही तरी बोलतो आणि पुन्हा मागे येत विजेच्या खांबाला पकडतो. पण दुर्देवाने अर्शदला विजेचा जोरदार झटका लागला आणि तो खांबालाच चिकटला.

अचानक घडलेल्या या घटनेने त्याच्याबरोबर असलेल्या इतर मुलांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत अर्शदचा जागीच मृत्यू झाला. अर्शदच्या मृत्यूला महावितरण कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या विद्युत खांबात तांत्रिक समस्या असल्याची तक्रार याआधी करण्यात आली होती. पण याची कोणतीच दखल घेण्यात आली नाही. अर्शदच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

दरम्यान, आमदार डॉ. फारूख शहा यांनी या दाट वस्ती असलेल्या भागातील सर्व तांत्रिक समस्या दूर करुन धोकादायक डीपी हटवण्याची मागणी केली आहे.