'अण्णा, तुम्ही आता जरा आराम करा' - गिरीश महाजन

धुळ्यात अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Updated: Dec 10, 2018, 02:21 PM IST
'अण्णा, तुम्ही आता जरा आराम करा' - गिरीश महाजन title=

धुळे : धुळ्यात अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर, भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. धुळ्यात भाजपचा आकडा ४५ च्या वर जाण्याची शक्यता आहे. धुळ्यात भाजपचा हा मोठा विजय मानला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, 'अनिल गोटे यांनी आता जरा आराम करावा, त्यांची तब्येत बरी दिसत नाही, त्यांनी ज्या प्रकारची भाषा निवडणुकीच्या काळात वापरली, व्हॉटसअॅप आणि फेसबूक आणि सोशल मीडियावर ही भाषा वापरली, ती योग्य नव्हती, ती धुळेकरांना मान्य नव्हती, यातच अण्णां गोटेंचा पराभव दिसत होता, मी निकालाआधी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, अण्णांची एकही जागा येणार नाही, पण त्यांच्या २ जागा आल्या, त्या आल्या कशा? हा प्रश्न मला आहे, अण्णांच्या २ जागा आल्या, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो', अशी खोचक टिपण्णी गिरीश महाजन यांनी अनिल गोटे यांच्या पराभवावर केली आहे.

गिरीश महाजन, यावर आणखी बोलताना म्हणाले, धुळ्याच्या जनतेला ८ दिवसांनी पाणी येत होतं. धुळेकरांचा आवाज दबलेला होता, त्यांनी तो आता व्यक्त केला आहे. धुळ्याच्या विकासासाठी लवकरच मोठी आर्थिक तरतूद करणार असल्याचं गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं.

भाजप आमदार अनिल गोटे यांना निवडणुकीआधी आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांनी मी सांगू तेच उमेदवार घ्या, हा आग्रह धरला, असं केलं असतं तर आकडा डबलही झाला नसता असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.