धाराशिवमध्ये हवालदाराचे हादरवणारं कृत्य; एसटीची वाट पाहणाऱ्या ऊसतोड महिलेवर केला अत्याचार

Dharashiv Crime : ऊसतोड मजूर महिलेवर पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह एका जीप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

आकाश नेटके | Updated: Feb 5, 2024, 10:56 AM IST
धाराशिवमध्ये हवालदाराचे हादरवणारं कृत्य; एसटीची वाट पाहणाऱ्या ऊसतोड महिलेवर केला अत्याचार title=

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : धाराशिवच्या भूम तालुक्यातून एक हादरवणारी घटना घडली आहे. धाराशिवमध्ये 25 वर्षीय ऊसतोड मजूर महिलेवर भूम ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सामान्य जनतेच्या रक्षणासाठी असलेले पोलीस कर्मचारी त्यांचे भक्षक झाल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 

भूम तालुक्यातील आष्टा वाडी शिवारात ही धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी भूम ठाण्यात संबंधित पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याला मदत केलेल्या खाजगी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच भूम पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकत अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पीडित ऊसतोड कामगार महिला व तिचा दिर दोघेही बार्शीकडे जाण्यासाठी भूम बस स्थानकात थांबले होते. यावेळी भूम ठाण्यात कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल दगडू सुदान भुरके याने बस स्थानकात जाऊन कुठून आलात, कशासाठी आलात ,चोर दिसताय असं सांगत त्यांना धमकावले आणि त्यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलने दोघांना एका खासगी जीपमध्ये बसवले आणि त्यांना बसस्थानकातून बाहेर नेत दहा हजार रुपयाची मागणी केली. दोघांनी त्यांच्याजवळ असलेले दहा हजार रुपये पोलीस कॉन्स्टेबल आणि जीप चालकाला दिले. पैसे घेतल्यानंतर पीडित महिलेला कॉन्स्टेबल दगडू सुदान भुरके याने आष्टा वाडी शिवारात नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कसेबसे महिलेने पोलीस ठाणे गाठले. पीडित महिलेच्या व दिराच्या फिर्यादीवरून भूम पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.

नवी मुंबईत 15 वर्षीय मुलीवर बलात्कार

नवी मुंबईत 15 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी 15 वर्षीय भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी नवी मुंबईतून एका व्यक्तीला अटक केली आहे. 34 वर्षीय आरोपी हा मूळचा नवी मुंबईतील नेरूळ येथील असून तो मुलीचा मामा आहे. आरोपीने 4 ऑक्टोबर 2023 रोजी घरात भाचीवर बलात्कार केल्याचा आरोप केल्याची माहिती नेरूळ पोलिसांनी दिली. पीडित मुलीने नंतर तक्रार केली होती. त्यानंतर तिला गोवंडी भागातील रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे ती गर्भवती असल्याचे समोर आले.