हातकणंगले : कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या वाचाळ भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त विधानाला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी गुरूवारी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सीमाभागात संतप्त पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एकाही सदस्याच्या केसाला धक्का लागला तरी गाठ शिवसेनेशी आहे असा सज्जड इशारा खासदार मानेंनी दिला आहे. कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ कळवा. पाहूया गोळ्या कमी पडतात की माणसं असं आव्हानही मानेंनी भीमाशंकर पाटलांना दिलं आहे. कानडी भीमाशंकर पाटलाला आव्हान देणारं बॅनर त्यांनी फेसबूकवर टाकलं आहे.
महाराष्ट्र - कर्नाटकचा सीमाप्रश्न गेल्या ६० वर्षांपासून भिजत पडला आहे. इथल्या मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली. यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर अगोदर मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर उभं करून गोळ्या घालून विषय संपवा, असं वादग्रस्त वक्तव्य भीमाशंकर पाटील यांनी केलं होतं. मराठी भाषिकांनी कर्नाटकच्या स्वाभिमानाला नेहमीच धक्का पोहचवल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.