Ajit Pawar On Maharashtra CM Post: भाजपसोबत येताना मला मुख्यमंत्री करतो, असे देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितले असते तर मी संपूर्ण पक्षच घेऊन आलो असतो, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यांच्या महत्त्वकांक्षी जन सन्मान यात्रेला नाशिक मधून सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते.या यात्रेत सर्वात लोकप्रिय ठरलेली लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांसाठी पोहोचवण्यासाठी गुलाबी रंगात सर्व यात्रा सजली आहे. मात्र अजित पवार यांच्या बॅनरवर 'माझी लाडकी बहीण' असे म्हटले आहे. ही योजना शिंदे सेनेकडून 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' अशी जाहिरात करत जाहिरातबाजी करण्यात आली होती. त्यामुळे एकूणच या योजनेवरील श्रेय घेण्यासाठी स्पर्धा महायुतीत सुरू असल्याच दिसून येतेय.
देवेंद्र फडणवीस 1999 साली आमदार झाले. एकनाथ शिंदे 2004 साली आमदार झाले. मी या दोघांना सिनियर आहे. मी 1990 च्या बॅचचा आमदार आहे. मात्र सगळे पुढे गेले आणि मागेच राहिलो, अशी खंत अजित पवारांनी बोलून दाखवली. मीदेखील माझ्या शेतात सकाळी जातो. पण एकनाथ शिंदे यांच्यासारखे प्रसारमाध्यमांमध्ये माझे मित्र नसल्याने माझी छायाचित्र येत नाहीत, असा चिमटा त्यांनी यावेळी लगावला. आमच्या तीनही पक्षांकडे ज्या जागा आहेत त्या जागा त्यांच्याकडे ठेवल्या जातील. पण जर काही सिटींग जागा बदलायच्या असतील तर त्याही प्रकारची तयारी आणि मानसिकता तिन्ही पक्षांनी आणि मित्र पक्षांनी ठेवलीय, असेही ते म्हणाले.
रक्षाबांधनानिमित्ताने माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली. या योजनेची राज्यभर चर्चा झाली आहे. हे बोलत असताना अजित दादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणणे टाळले. रक्षाबांधनानिमित्ताने माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणली. या योजनेची राज्यभर चर्चा झाली आहे. महिलांचा हक्क कुठेही हिरावला जाणार नाही हा माझा वादा असल्याचे ते म्हणाले. रक्षा बंधनापर्यंत 3000 रू तुम्हाला मिळतील. तुमच्या मनाप्रमाणे खर्च करा. त्यामुळे बाजारात तेजी येईल. कालच 6000 कोटींच्या फाईलवर मी सही करून निघालोय, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्याला वीज बिल माफ केले आहे. मागची थकबाकी देऊ नका. वायरमन आला मागायला तर त्याला सांगा अजित पवारने नाही सांगितलंय, असे ते म्हणाले. अल्पसंख्यक बांधवांनी लोकसभेत आम्हाला हवी तशी साथ दिली नाही त्यासाठी आम्ही मौलाना आझाद महामंडळ आणले आहे. आता बार्टीप्रमाणे त्यांच्यासाठी मार्टी आणल्याचेही ते म्हणाले.