महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

Devendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.   

वनिता कांबळे | Updated: Sep 6, 2024, 10:03 PM IST
महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा title=

Foreign Direct Investment In Maharashtra : देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% परकीय गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आहे. पहिल्या तिमाहीमध्ये महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या आठ राज्यांच्या गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही राज्यात अधिक गुंतवणूक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गेली २ वर्ष परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १वर असलेल्या महाराष्ट्रात 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतसुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.

कोणत्या राज्यात किती गुंतवणूक?

महाराष्ट्रात एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तीन महिन्यात एकूण 70 हजार 795 कोटींची गुंतवणूक आली. दुस-या क्रमांकावर आहे कर्नाटक. कर्नाटकात 19,059 कोटींची गुंतवूक झाली.  तर तिस-या  क्रमांकावरील दिल्लीत 10,788 कोटी गुंतवणूक आली. तेलंगणा चौथ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 9 हजार 23 कोटींची गुंतवणूक आहे.  तर महाराष्ट्रातले विरोधक सातत्याने ज्या गुजरातचा उल्लेख करतात ते राज्य पाचव्या क्रमांकावर आहे.. गुजरातमध्ये फक्त 8 हजार 508 कोटींची गुंतवणूक आलीय.  सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडूत 8,325 कोटी), सातव्या क्रमांकावरील हरयाणात 5,818 कोटी तर आठव्या क्रमांकावरील उत्तरप्रदेशमध्ये फक्त 370 कोटींची परकीय गुंतवणूक आलीय.  तर नवव्या क्रमांकावरील राजस्थानमध्येही 311 कोटींची परकीय गुंतवणूक आलीय. देशातल्या या सर्व राज्यांच्या बेरजेपेक्षाही अधिक परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे..

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.  या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46 टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी 2022-23 मध्ये 1 लाख 18 हजार 422 कोटींची गुंतवणूक आली होती.  तर 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी गुंतवणूक आली होती.  राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण : 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती. अडीच वर्षांत आम्ही 5 वर्षांचं काम करुन दाखवू, हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं. आता सव्वा दोन वर्षांत 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखविली. दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे, असंही फडणवीसांनी सांगितले.