'माझ्याकडून चूक झाली,' सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांनी दिली कबुली; 'राजकारण घरात...'

Ajit Pawar on Politics: राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली अशी कबुलीच अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. अजित पवारांनी ही कबुली दिल्याने भविष्यात पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चाच रंगली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 13, 2024, 03:52 PM IST
'माझ्याकडून चूक झाली,' सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांनी दिली कबुली; 'राजकारण घरात...' title=

Ajit Pawar on Politics: लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या आणि लक्ष लागलेल्या लढतींमध्ये बारामती (Baramati) मतदारसंघाचा समावेश होता. याचं कारण बारामती मतदारसंघात थेट पवार विरुद्ध पवार अशी लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेसने सुप्रिया सुळेंविरोधात थेट सुनेत्रा पवारांना (Supriya Sule vs Sunetra Pawar) मैदानात उतरवलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीत नणंद जिंकणार की भावजय याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर सुप्रिया सुळे यांनी ही निवडणूक जिंकली. दरम्यान आता अखेर अजित पवारांनी आपल्याकडून चूक झाली अशी कबुली एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. 

 राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली असं अजित पवार म्हणाले आहेत. मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं अशी कबुलीच त्यांनी दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवी नांदी पाहायला मिळणार का याची चर्चा रंगली आहे. 

अजित पवारांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारलं असता त्यांनी कबुली देत म्हटलं की, “सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं पण बहिणी सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालतं. राजकारण हे पार घरात शिरु द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली". 

पुढे ते म्हणाले, "मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झालं ते एकदा बाण सुटल्यासारखं होतं. आज मला माझं मन सांगतं आहे की तसं व्हायला नको होतं”.

सुप्रिया सुळेंना प्रसारमाध्यमांनी यावर प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, "एकतर मी हे विधान ऐकलेलं किवा वाचलेलं नाही. तुमच्याकडूनच मी हे ऐकत नाही. त्यामुळे रामकृष्ण हरी". दरम्यान संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "सुनेत्रा वहिनींना उभं करायचं की नाही हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे".