भंडारा : पूर्व विदर्भातील महापुरात ज्यांची शेती पुरामुळे नष्ट झाली, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 18 हजार रुपये मदत देण्याचं, मदत व पूनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. मात्र शेतकऱ्यांकडून हेक्टरी 50 हजार देण्याची मागणी करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांनी भंडाऱ्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
मध्यप्रदेश सरकारने संजय सरोवर धरणाचे सर्व दरवाजे उघडले. याबाबत मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला वेळीच माहिती दिली नाही. त्यामुळे भंडार, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पूराचा भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला मोठा फटका बसला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेकडो घरं पाण्याखाली गेली. घरांचं, शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. गावच्या गावं पुराच्या पाण्याने वेढली गेल्याने, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातला पूर आता ओसरला आहे. नदीकाठच्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र या पुरात घराचे झालेले नुकसान या ग्रामस्थांची चिंता वाढवत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हे करुन पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना 95 हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये आणि अंशतः पडझड झाली असेल तर 15 हजार रुपये दिले जाणार आहेत.