'मी शिर्डीत प्रार्थना केल्याने कोल्हापुरात पूर आला नाही', केसरकरांचा अजब दावा; भुजबळ म्हणाले 'नाशिकला या...'

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अजब दावा केला आहे. मी शिर्डीत असल्याने कोल्हापूरला पूर आला नाही असं विधान केसरकर यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोला लगावला आहे. आमची धरणे पूर्ण भरून द्या असं त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 30, 2023, 01:40 PM IST
'मी शिर्डीत प्रार्थना केल्याने कोल्हापुरात पूर आला नाही', केसरकरांचा अजब दावा; भुजबळ म्हणाले 'नाशिकला या...' title=

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) आपल्या एका अजब वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मी शिर्डीत असताना देवाकडे प्रार्थना केल्याने कोल्हापूरला पूर आला नाही असं अजब विधान दिपक केसरकर यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोला लगावला आहे. आमची धरणे पूर्ण भरून द्या असं त्यांनी उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 

काय म्हणाले दिपक केसरकर?

"अंधश्रद्धा म्हणा, श्रद्धा म्हणा किंवा काहीही म्हणा. पूरपरिस्थिती असताना मी योगायोगाने शिर्डीत गेलेलो होतो. कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून पाणी सोडले की, 5 फूट पातळी वाढते हे सर्वांना माहिती आहे. पण यंदा योगायोगाने मी शिर्डीत होतो, त्यामुळे एक फुटानेही पातळी वाढली नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही तपासून पाहू शकता. मी ठाण मांडून होतो. त्यावेळी मी देवाकडे हे संकट टळू दे अशी प्रार्थन करत होतो. त्या प्रार्थनेतही ताकद असते. तुम्ही पाटबंधारेकडे चौकशी केली तर 5-6 फूट पाण्यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असती ही माहिती मिळेल. निसर्गात पण देव आहे. प्रार्थनेत ताकद आहे, अध्यात्म महत्वाचे आहे," असं दिपक केसरकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

छगन भुजबळांची प्रतिक्रिया

दिपक केसरकर यांच्या या विधानाबद्दल विचारण्यात आलं असता छगन भुजबळांनी उपहासात्मकपणे भाष्य केलं. ते म्हणाले की "इकडे या आणि देवाचा धावा करा आणि आमची धरणे पूर्ण भरून द्या. केसरकरांनी नाशिकमध्ये यावे . प्रार्थना करून 50 टक्के पाणी पूर्ण भरून द्यावे". 

दरम्यान या पत्रकार परिषदेत दिपक केसरकर यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं. "मुलांच्या पुस्तकाचं ओझं कमी झालं पाहिजे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या, हे आमचे ध्येय आहे. शिक्षक भरती आम्ही सुरू केली. ही भरती होणार, हे गृहीत धरून आम्ही जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या", अशी माहिती त्यांनी दिली. 

शिक्षण विभाग अधिकारी चौकशीबद्दल त्यांनी सांगितलं की, "निलंबन झाल्यानंतर सहा महिन्यानंतर सेवेत घ्यावे लागते. अनेक जणांच्या निलंबनाचे तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. आमच्याकडे एकही मनुष्य कुणाकडे पैसे मागत नाही. सावकाश पणे प्रत्येक क्षेत्रात बदल होईल. कुणाला काढणे हा उद्देश नाही, पण याला जरब बसली पाहिजे. जिथे जिथे तक्रारी होत्या, त्यांना साईड पोस्ट देण्यात आली आहे. तक्रारी खऱ्या आहेत की नाही, हे बघावं लागतं. 10 ते 20 टक्के वाईट लोकं विभागाचे नाव खराब करतात. हळू हळू आम्ही सफाई करत आहोत". 

"उद्धव ठाकरेंना सत्ता गेली याचा राग आहे. त्यांनी थोडंस दुर्लक्ष करायला पाहिजे. त्यांनी आता हे बोलणं थांबवलं पाहिजे. परत आम्ही काही बोललो तर त्यांना अपमानास्पद वाटतं," असंही ते म्हणाले.