पूर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघाचा मृतदेह तरंगता आढळल्याने खळबळ

गेल्या पाच महिन्यात या वाढोदा वनक्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाल्यानं वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय.

Updated: Aug 13, 2018, 12:27 PM IST
पूर्णा नदीपात्रात पट्टेदार वाघाचा मृतदेह तरंगता आढळल्याने खळबळ title=

मुक्ताईनगर: जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातल्या पूर्णा नदीच्या पात्रात पट्टेदार वाघाचा मृतदेह तरंगत आल्यानं एकच खळबळ उडाली. काही शेतकऱ्यांना वाघाच्या कुजलेल्या मृतदेहाची दुर्गंधी आल्यानं सगळा प्रकार उघडकीस आला. वाघाचं वय अंदाजे १० वर्ष असून त्याची शिकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. मुक्ताईनगर आणि आजूबाजूच्या  जंगल परिसरात पात ते सात पट्टेदार वाघ आहेत. आता गेल्या पाच महिन्यात या वाढोदा वनक्षेत्रात दोन वाघांचा मृत्यू झाल्यानं वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय.

वाघाच्या कंबरेला नायलॉनची दोरी

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पूर्णा नदी पात्रात पट्टेदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय. काही शेतकऱ्यांना पूर्णा नदी पात्रातून दुर्गंधी येते होती. त्यांनी नदी पात्रात शोध घेतले असता मृत वाघाचे शव तरंगताना दिसले. मृत वाघ हा अंदाजे दहा वर्षे वयोगटातील असून, या वाघाच्या कंबरेला नायलॉनची दोरी गुंडाळली होती. यामुळं त्याच्या शिकारीचा संशय बळावलाय. डोलारखेडाच्या जंगलात पाच ते सात पट्टेदार वाघांचा संचार असून, अवघ्या पाच महिन्यात वढोदा वनक्षेत्रात दोन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्यानं वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

अलिकडच्या काळातील दुसरी घटना

यापूर्वी २३ मार्च २०१८ रोजी वढोदा वनक्षेत्रात आणखी एक पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळला होता. आता ही दुसरी घटना आहे. वारंवार वाघांच्या मृत्यूच्या घटना घटत असल्यानं वढोदा वनक्षेत्राचं वैभव नामशेष होत की काय असा गंभीर प्रश्न वन्यजीवप्रेमींना पडलाय. चारठाणा येथील जंगलात या वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यांनंतर त्याच्या मृत्यूचे खरं कारण समजू शकेल असं वनविभागाचे म्हणणे आहे.