पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थीनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले की, शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
या प्रकरणात 5 आरोपींविरोधात बिबवेवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी शुभम भागवत हा मुलीचा नातेवाईक आहे. पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आणि इतरांचा शोध सुरू झाला आहे.
अल्पवयीन मुलीच्या हत्येनं पुणे हादरलं आहे. एकतर्फी प्रेमातून एका 14 वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. क्षितिजा व्यवहारे असं मृत मुलीचं नाव असून ती आठवीत शिकत होती. एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षितिजा कबड्डीपटू होती.
बिबवेवाडीतील यश लॉन समोरील मैदानावर क्षितीजा मैत्रिणींसोबत कबड्डी खेळत होती. त्याचवेळी एक तरुण तिथे आला. तो तिला बाजूला घेऊन गेला आणि तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात क्षितिजाचा जागेवरच मृत्यू झाला. साथीदारांसह मोटरसायकलवरुन आलेल्या आरोपीने क्षितीजावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर आरोरी फरार झाले असून बिबवेवाडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.