दिवाळीत फटाक्यांवर बंदी ? राज्य सरकार निर्णयाच्या तयारीत

 दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा 

Updated: Nov 5, 2020, 03:13 PM IST
दिवाळीत फटाक्यांवर बंदी ? राज्य सरकार निर्णयाच्या तयारीत  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राजस्थान, ओडीसा, सिक्कीम या राज्यानंतर महाराष्ट्रातही दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा टोपे यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ते मंत्रीमंडळ बैठकीत ही मागणी करणार आहेत. दिवाळीत राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते. कोरोनात श्वसनाला त्रास होतो. त्यामुळे ]यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. 

दिवाळीनंतर थंडीत येणारी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून राज्य सरकारने या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज यासंदर्भात टास्क फोर्स आणि डेथ ऑडीट कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत दुसरी लाटेचा जास्त प्रादुर्भाव चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर फटाकेमुक्त दिवाळी साजरी व्हावी अशी चर्चाही आजच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे याबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ही मागणी करणार आहेत. त्यामुळे मंत्रीमंडळ बैठकीत काय निर्णय होतो ? त्याकडे लक्ष लागलंय.

संभाव्य दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी कशी तयारी करता येईल याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यात टेस्टींगमध्ये खंड पडू द्यायचा नाही, एका पॉझिटीव्ही रुग्णाच्या संपर्कातील २० जणांचा शोध घेण्याचा निर्णय, थंडीच्या दिवसातील आजारांवर विशेष लक्ष देण्याचा निर्णय, तसंच लोकसंपर्क जास्त असणारे लोक, जसे छोटे व्यावसायिक, घरकामगार, सार्वजनिक वाहतुकीत काम करणारे लोक यांची मोठ्या प्रमाणात तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.