ठाणे : कोरोनाचे रुग्ण (Covid Patients) वाढत असताना ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) आणि पोलिसांचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. कोरोनामुळे (CoronaVirus) मृत्यू झालेले मामलेदार मिसळचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांच्या अंत्ययात्रेत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे पाहायला मिळाले. चक्क त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शववाहिकेचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे कोरोना होण्याचा धोका वाढला आहे.
नियमानुसार कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचे शव एकदा शववाहिकेत ठेवल्यावर ही शववाहिका थेट स्मशानभूमीत उघडली जाते. परंतु लक्ष्मणशेठ यांचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या शववाहिकेचे दरवाजे चक्क दोनदा उघडण्यात आले. मामलेदार मिसळ हॉटेलच्या बाहेर आणि आमंत्रण हॉटेलच्या बाहेर दरवाजे उघडून नागरिकांना फुलं आणि श्रद्धांजली अर्पण करण्याची मुभा दिली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोरोनाने संक्रमित मृतदेह कधीच उघडण्यात येत नाहीत. या मोठ्या चुकीमुळे अनेकांना कोरोनाची बाधा होण्याची भीती आहे. त्यामुळे असा हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.