कोल्हापूर : झी मीडियानं कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागाच्या ४ कोटी वृक्षलागवडीमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची बातमी पुराव्यानिशी दाखवली.
या बातमीनंतर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांनी झी मीडियाला मुलाखत दिली आणि करवीर वनविभागातील अधिका-यांची चौकशी सुरु केल्याचं सांगितलं. मात्र ही चौकशी सुरु होण्यापूर्वीच वनविभागाच्या अधिका-यांनी संगनमत करुन आपला भ्रष्टाचार लवपण्याचा केवीलवाणा प्रयत्न सुरु केला. मात्र झी मीडियानं तिथंही या अधिका-यांना रंगेहात पकडलं.
आपण केलेल्या चूकीची कल्पना येताच वन विभागाच्या कर्मचा-यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा तोही प्रयत्न फसला. दरम्यान झी मिडीयाच्या वृत्ताची दखल घेत झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी अधिकारी आळते आणि घोसरवाडच्या साईटवर येणार यांची माहिती मिळाल्यानंतर करवीरच्या वनाधिका-यांनी या झाडांना रात्री लपुन छपुन पाणी घालण्याचा प्रयत्न केला.
वनविभागाच्या वृक्षलागवडीदरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झी मीडियानं केली. झी मीडियानं दाखवलेल्या बातमीत तथ्य आढळल्यानंतर कोल्हापूर वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयातील चुकीच्या पद्धतीनं झालेल्या कामांची चौकशी सुरु केली आहे. यासाठी चौकशी समिती गठित करुन कोल्हापूर वनपरिक्षेत्रातील करवीर, सांगली वनपरिक्षेत्रातील मौजे भोसे, शिराळा आणि सातारा जिल्हयातील राजमाची, वर्णे इथल्या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वनविभागाचे अधिकारी यात दोषी आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं त्यांनी झी मीडियाला सांगितलं आहे.
मुख्य वनसंरक्षकांनी चौकशी समिती गठीत करुन चौकशी सुरु केली. पण जागेवर जाऊन कामाची तपासणी करण्यापूर्वी वनविभागाचे अधिकारी भ्रष्टाचार लपविण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत. पण हे भ्रष्ट अधिकारी सुटणार नाहीत याकडं झी मिडियाचं बारीक लक्ष असणार आहे.