मुंबई : राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. कोरोनाचे 6112 नवे रूग्ण वाढले असून 44 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 44,765 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अकोला, वर्धा अमरावती, यवतमाळमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर मुंबईतील धारावीतही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त येत आहे. मात्र, कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही, असे स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहे. (Coronavirus disease: No foreign strain found - Health Department )
अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.
पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. या अनुषंगाने अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे.