नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशातली सगळीच राज्य संपूर्ण ताकद पणाला लावून काम करत आहेत. कोरोनाचा सामना करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुणे मॉडेलचं कौतुक केलं आहे. कोरोना व्हायरसचा सामना करताना पुण्याने उत्कृष्ट काम केल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. याआधी राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यानेही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हा आधीच लॉकडाऊन केला होता.
पुण्यामध्ये ३५ किमी अंतराचं कंटिजेंट तयार करुन या भागातल्या प्रत्येक घराचं सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणानंतर संशयित आणि लक्षण असणाऱ्यांना निगराणीमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना व्हायरससाठी ३ किमीचा भाग फोकल पॉइंट तर ५ किमीचा भाग बफर झोन मानला जातो. यानंतर कोरोना व्हायरसचा परिसरात कशापद्धतीने फैलाव झाला आहे, हे ठरवलं जातं. या आधारावर कोणत्याही भागाची व्याप्ती ठरवली जाते.
सुरुवातीला पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते, पण पुणे मॉडेलमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयातल्या सूत्रांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २०४ एवढी झाली आहे, तर पुण्यात २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाचे १६८, पिंपरी चिंचवडमध्ये २२, ग्रामीण भागात १४ रुग्ण आहेत. मागच्या २४ तासात पुण्यात कोरोनाचे ३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये २ रुग्ण वाढले आहेत.
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे १,३४६ रुग्ण आहेत, यातले ११७ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईमध्ये कोरोनाचे ७९ नवे रुग्ण वाढले आहेत. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ७४६ झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.