बारामती कोरोनामुक्त, रेड मधून ऑरेंज झोनमध्ये

महिनाभरापासून बारामतीकरांची कोरोनाशी लढाई सुरू होती.

Updated: Apr 30, 2020, 11:16 PM IST

जावेद मुलाणी, झी २४ तास, बारामती : बारामतीतील उपचार सुरू असलेल्या एका कोरोनाग्रस्तांची मुदत संपुन त्याला आज घरी सोडण्यात आले. परिणामी आजच्या घडीला बारामती पूर्णपणे कोऱोनामुक्त झाले असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले. गेल्या महिनाभरापासून बारामतीकरांची कोरोनाशी लढाई सुरू होती. शहरातील श्रीराम नगर भागात एका रिक्षाचालकाला २९ मार्च रोजी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. तो रुग्ण उपचारानंतर बरा झाला. त्यानंतर समर्थ नगर भागातील एका भाजी विक्रेत्यांना पूर्ण झाला. त्याचा मुलगा सून आणि दोन नाती यांनाही कोररोनाने गाठले यात भाजी विक्रेत्याचा  मृत्यू झाला होता.  

परंतु त्याच्या कुटुंबातील अन्य चौघांनीही कोरोनावर यशस्वी मात केली.  रुग्णालयातून उपचारांनंतर बारामतीत दाखल झाल्यावर त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागतही करण्यात आले.

शहरातील म्हाडा कॉलनी भागातील एका जेष्ठ व्यक्तीला कोरोना झाला. परंतु त्यांनीही कोरोनावर यशस्वी मात केली. त्यांची दुसरी आणि तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना ससून रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. शहरात सात पैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य सहा जणांनी कोरोनावर यशस्वी  मात केली. 

तालुक्याच्या ग्रामीण भागात माळेगावात एक जेष्ठ नागरिक कोरोना संक्रमित आढळला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कातील अन्य ११ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. या रुग्णाने १६ एप्रिल रोजी बारामती सोडत उपचारासाठी पुणे गाठले होते. 

त्यामुळे या भागातील प्रतिबंधित क्षेत्राचा कालावधी ३० एप्रिल गुरुवारी संपला. महिन्याभरातच बारामती पॅटर्नच्या जोरावर तालुका पूर्ण मुक्त झाल्याने बारामती पॅटर्न एक राज्यात आदर्श झाल्याचे बोलले जात आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजस्थानमधील भीलवाडा पॅटर्नची अनुभूती घेत पुणे जिल्ह्यातल्या आपल्या बारामती पॅटर्न राबविला. तसेच अधिकारी वर्गाने देखील या पॅटर्नसाठी कष्ट घेतल्याने बारामतीत आता एकही रुग्ण राहिलेला नाही. सहाजिकच बारामती आता रेड झोन मधून ऑरेंज झोनमध्ये आली आहे.

एकंदरीतच बारामती परिसरातील सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी घरातून बाहेर न पडता सोशल डिस्टन्सचे पालन तंतोतंत करावे अशा सूचना वारंवार प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे.