त्र्यंबकेश्वरमध्ये ब्राह्मण संघटनांमध्ये तुंबळ हाणामारी

त्रंबकेश्वरमध्ये याच दोन गटात यापूर्वीदेखील अनेक वाद झाले आहेत.

Updated: Jun 8, 2019, 01:46 PM IST
त्र्यंबकेश्वरमध्ये ब्राह्मण संघटनांमध्ये तुंबळ हाणामारी title=

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे स्थानिक ब्राह्मण आणि बहुउद्देशीय ब्राह्मण संघटनेचे पुजारी यांच्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली. स्थानिक ब्राह्मणांनी बहुउद्देशीय ब्राह्मण संघटनेच्या ब्राह्मणांना नारायण नागबळीची पूजा करण्यास विरोध केल्याने हा वाद पेटला. बहुउद्देशीय ब्राह्मण संघटना यांनी पूजा करण्यासाठी खाजगी जागा भाडेतत्त्वावर घेत त्या ठिकाणी नारायण नागबळी पूजा करण्याचे काम सुरू होते. 

त्रंबकेश्वरमध्ये याच दोन गटात यापूर्वीदेखील अनेक वाद झाले आहेत. मात्र यावेळी चक्क हा वाद हाणामारी आणि प्रचंड शिवीगाळ या स्वरूपात येऊन ठेपला आहे. याबाबत बहुउद्देशीय ब्राह्मण संघटनेच्या पुजाऱ्यांनी त्रंबकेश्वर पोलिसात तक्रार अर्ज दाखल केला. त्यानंतर १७ पुजाऱ्यांवर मारहाण, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक ब्राह्मण गेल्या अनेक वर्षांपासून नारायण नागबळीची पूजा करतात. परंतु काही वर्षांपूर्वी आलेल्या बहुउद्देशीय ब्राह्मण संघटनांनी नारायण नागबळीची पूजा करण्यास सुरुवात केली. यासाठी स्थानिक ब्राह्मणांनी  त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने हा वाद सुरु झाला. या संपूर्ण प्रकारामुळे भाविकांचीही दिशाभूल होत असल्याचा आरोप स्थानिक ब्राह्मणांनी केला आहे.