जालना : दैनंदिन आयुष्यात आपण सतत चलनी नोटा हातळत असतो. दररोजच्या व्यवहारात नोटांची देवाण-घेवाण केल्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही. मात्र आपण हातळत असलेल्या नोटा आपल्या आरोग्यासाठीच घातक असल्याचं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातून समोर आलंय.
आपल्या दररोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या 10, 20, 50,100 आणि 500 रुपयांच्या नोटा आपल्या आरोग्यासाठी घातक असल्याचं संशोधनातून समोर आलंय. जालना जिल्ह्यातील मंठा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
या विद्यार्थ्यांनी हमाल, मापाडी, भाजीविक्रेते, फेरीवाले यांच्याकडे असलेल्या 10, 20, 50,100 आणि 500 रुपयांच्या नोटांवर संशोधन केलं. या संशोधनातून वारंवार हाताळलेल्या नोटांवर 16 प्रकारच्या बुरशी असल्याचं संशोधनातून समोर आलं.
नोटांवर असलेल्या बुरशीच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी पोटॅटो डेक्सट्रोज वापरले.
त्यावेळी नोटांवर अँस्परजिल्लस नायगर, फ्लावस, पेनिसिलीयम नोटॅटम,लॉरीय,अल्टरनारीया,कॅण्डीडा अलबीकॅन्स,क्लॉडोस्पोरीयम अशा 16 प्रकारच्या बुरशी आढळून आल्या.
आपल्यापैकी बरेचजण खिशात नोटा ठेवताना पॉकीट वापरतात. तर काही जण थेट खिशात नोटा ठेवतात. अनेकवेळा आपल्याला घाम येतो.
नोटांवरील बुरशी घामाच्या संपर्कात आल्यानंतर बुरशींना खाद्य मिळतं. घामामुळे नोटांची झीज तर होतेच शिवाय नोटांवरील बुरशी वाढल्यानं त्वेचेचे आजार होण्याची शक्यता आणखी बळावते.
नोटांवर आढळून आलेल्या बुरशींचा आरोग्यावर दुष्परीणाम होतो. त्यामुळे नोटांवरील बुरशींना रोखण्यासाठी याच विद्यार्थ्यांकडून प्रयत्न सुरु आहेत.
शिवाय नोटांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी लवंग तेल, तुळशी तेलाचा उपयोगही केला जाणार असल्याचा दावा याच संशोधक विद्यार्थ्यांनी केलाय.