नागपूर : मुंबई आणि अहमदाबादमधली बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातली योजना आहे. पण काँग्रेसचे सत्ता आली तर ही योजना रद्द करू असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहारिक नसल्याचंही चव्हाण म्हणाले. एवढच नाही तर बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये राज्य सरकारची हिस्सेदारी वाढवण्यालाही काँग्रेसनं विरोध केला आहे. या प्रोजेक्टमध्ये राज्याच्या हिस्सेदारीमध्ये २५० कोटी रुपये वाढवण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव पास झाला असला तरी पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र याला विरोध केला आहे. हे प्रोजेक्ट व्यवहारिक नाही आणि फक्त खयाली पुलाव असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
यूपीएच्या काळामध्ये बुलेट ट्रेन प्रोजेक्टबाबत अभ्यास करण्यात आला तेव्हा त्याची किंमत ६५ हजार कोटी रुपये होती. पण मोदींची सत्ता आल्यानंतर ही किंमत वाढून ९५ हजार कोटी रुपये झालं आणि जपानसोबत करार झाला तेव्हा हीच किंमत १,१०,००० कोटी रुपये झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
मोदी सरकार बुलेट ट्रेन बनवू शकत नाही ते फक्त मॅजिक ट्रेन बनवू शकतात, असं राहुल गांधी म्हणाले होते. बुलेट ट्रेनचं स्वप्न फक्त काँग्रेसच पूर्ण करू शकतं. मग जर राहुल गांधी बुलेट ट्रेन पूर्ण करण्याचं वक्तव्य करत असतील तर मग पृथ्वीराज चव्हाण यांच्या बुलेट ट्रेन रद्द करण्याच्या वक्तव्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.