MP Balu Dhanorkar Funeral At Warora : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात वयाच्या 47 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज वणी-वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी धानोरकर यांच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पत्नी प्रतिभा यांनी त्यांना एकटक पाहत शेवटचं दर्शन घेतले. पत्नीचे दुःख पाहून उपस्थितांनाही आपले अश्रु आवरता आले नाही. हे दृश्य मन हेलावणारे होते.
धानोरकरांचे पार्थिव त्यांच्या वरोरातील निवासस्थानी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. धानोरकर हे काँग्रेसचे राज्यातले एकमेव खासदार होते. बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूरवर मोठी शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्यातील नेते उपस्थित होते. केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भ व इतर भागातील कार्यकर्तेही आपल्या नेत्याला निरोप देण्यासाठी वरोरा येथे आले आहेत.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची अंत्ययात्रा मोक्षधामच्या दिशेने रवाना झाली. खासदार मुकुल वासनिक, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे हे उपस्थित होते.
बाळू धानोरकरांच्या पार्थिवावर चंद्रपूरच्या वरोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठी गर्दी झाली होती. वरोरा शहरातल्या मोक्षधाम येथे प्रशासनाच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने मोक्षधाम येथे तयारी करण्यात होती. हजारो कार्यकर्ते -पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते या अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित होती. यावेळी त्यांना हजारो लोकांसमोर सलामी देण्यात आली.
बाळू धानोरकर यांना 26 मे रोजी नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांनी मंगळवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांआधीच त्यांचे पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले होते. खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. तसेच मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरले होते.