नवी मुंबई : ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर नंतर आता नवी मुंबईमध्ये देखील लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. ३ जुलैपासून १३ जुलैपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी या बाबतचे आदेश जारी केले असून एपीएमसी आणि औद्योगिक क्षेत्राला मात्र यामधून वगळले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना चिंतेचं वातावरण आहे. नवी मुंबईला लागून असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेल मध्ये देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे.
नवी मुंबईत आज कोरोनाचे २१८ रुग्ण वाढले असून एकूण कोरोना संकमितांची संख्या ६८२३ वर पोहोचला आहे. आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या २१७ वर पोहोचली आहे.
आज बेलापूरमध्ये ३०, नेरुळ २७, वाशी १८, तुर्भे २४, कोपरखैरणे २७, घणसोली ३३, ऐरोली ४९, दिघा १० रुग्ण आढळले आहेत. तर आज ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.