सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या

 महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यामागे सुरक्षा हे प्रमुख कारण असल्याची माहिती 

Updated: Aug 7, 2019, 05:33 PM IST
सुरक्षेच्या कारणास्तव राज्यातील महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलल्या title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : ऑगस्टमध्ये होणाऱ्या महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यामागे सुरक्षा हे प्रमुख कारण असल्याची माहिती समोर आली आहे. महाविद्यालयीन निवडणुकीसाठी सुरक्षा पुरवणं शक्य नसल्याने त्या पुढे ढकलाव्यात अशी विनंती राज्याच्या गृहविभागाने राज्य सरकारला केली होती. ही विनंती लक्षात घेऊन राज्य सरकारने ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुका नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. 

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका आणि जम्मू काश्मिरमधील परिस्थिती लक्षात घेता महाविद्यालयीन निवडणुकीपेक्षा इतर ठिकाणी सुरक्षा पुरवणं आवश्यक असल्याचं गृह विभागाने राज्य सरकारला कळवलं होतं. केंद्र सरकराने राज्यातील नक्षल भागातील सीआरपीएफच्या सहा तुकड्या जम्मू काश्मिरमध्ये तैनात केल्या आहेत.

सध्या राज्यातील पोलीस दलाची प्राथमिकता राज्यातील सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करण्याची असल्याचं सांगत गृह विभागाने महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणारं पत्र राज्य सरकारला पाठवलं होतं. 

गृहविभागाच्या या पत्रानंतर राज्य मंत्रिमंडळाने आज महाविद्यालयीन निवडणुका ऑगस्टऐवजी नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला. राज्यात तब्बल २५ वर्षांनी या महाविद्यालयीन निवडणुका होत आहेत.