शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहिदांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

Updated: May 2, 2019, 07:10 PM IST
शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - मुख्यमंत्री  title=

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १५ जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी कुरखेड्यातील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी १५ शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहिदांच्या कुटुंबीयांचीही भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. 

नक्षली हल्ल्याप्रकरणी पोलीस महासंचालक स्वतः लक्ष घालून चौकशी करत आहे. तसंच या प्रकरणात काही कमतरता राहिली का याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. शहीद जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

दुसरीकडे नक्षलवाद्यांना अज्ञात राजकीय शक्तींचा पाठिंबा असल्याचा संशय शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नक्षल्यांकडे सर्व यंत्रणा असल्याचं दिसून येतं आहे. त्यांचा छडा लागला तर सरकार सोडणार नाही असं ते म्हणाले. नक्षल्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे स्ट्राईक करण्याची वेळ आल्याचं देखील ते म्हणाले.