देवेंद्रंच्या मुख्यमंत्रीपदाला मंगळ आडवा येऊ नये, म्हणून मंगळग्रह देवाला महाअभिषेक

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची तारीख निश्चित होत नसल्याने, मंगळग्रह देवाला

Updated: Nov 6, 2019, 08:28 PM IST
देवेंद्रंच्या मुख्यमंत्रीपदाला मंगळ आडवा येऊ नये, म्हणून मंगळग्रह देवाला महाअभिषेक title=

जळगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची तारीख निश्चित होत नसल्याने, मंगळग्रह देवाला काही भाजपा कार्यकर्त्यांनी साकडं घातलं आहे. यासाठी अमळनेर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन मंगळग्रह मंदिरात जावून मंगळग्रह देवाला महाअभिषेक घातला. तसेच कार्यकर्त्यांच्या भावनाच फडणवीस साहेबांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार असल्याचं यावेळी आमदार स्मिता वाघ यांनी सांगितलं. विशेष म्हणजे अमळनेर आणि कोलकाता या दोनच ठिकाणी मंगळग्रह मंदिर असल्याचा दावा केला जातो. देशभरातील मंगळ असणारे व्यक्ती या ठिकाणी येऊन मंगळग्रहाची पुजा करतात.

महाराष्ट्रात एकमेव मंगळग्रह मंदिर असल्याचा दावा

महाअभिषेक घालण्यासाठी भाजपाच्या आमदार सौ. स्मिता वाघ आणि माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य केला. यानंतर मंगळग्रहाला अभिषेक घालण्यात आला. यावेळी अमळनेर बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार यांनी पुढाकार घेतला.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना महायुतीला जनादेश मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. परंतु जागा वाटपावरून युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख लांबत चालली आहे. ही तारीख लांबू नये म्हणून हा महाअभिषेक असल्याचं भाजपा शहराध्यक्ष शितल देशमुख यांनी म्हटलं आहे.

प्रत्यक्षात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात उत्तम काम केले. पुन्हा तेच नेतृत्व राज्याला लाभावे अशी जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु तिढा सुटतच नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, ही संपावी, शालिग्राम पवार भटक्या विमुक्त जाती आघाडी अध्यक्ष यांनी यावेळी सांगितलं.

अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळ आहे. या कार्यात त्यांना मंगळच आडवा येत असल्याची माहिती अमळनेर येथील भाजपा कार्यकर्त्याना मिळाल्यानंतर त्यांनी भारतात अमळनेर आणि कलकत्ता या दोनच ठिकाणी मंगळग्रह देवाची मंदिरे आहेत. 

तेव्हा आमदार स्मिता वाघ आणि उदय वाघ यांचे निवासस्थान गाठून यासंदर्भात चर्चा केली आणि त्यांच्याच सूचनेनुसार मंगळग्रह मंदिर गाठून पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत महाभिषेक केला. सुमारे दोन तास हा महाभिषेक सुरू होता. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देखील यावेळी उपस्थिती दिली.

मुख्यमंत्रीपदावर फडणवीस कायम राहतील या कार्यकर्त्यांच्या भावना - आमदार स्मिता वाघ

संपूर्ण राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. या राजाला धीर देण्यासाठी आणि या सुलतानी संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत. ही तमाम शेतकरी बांधवांची आणि जनतेची इच्छा आहे. खरेतर तो दिवस दूर नाहीच हा आमचा विश्वास आहे. परंतु भावनाशील झालेल्या कार्यकर्त्यानी मंगळ आडवा येऊ नये यासाठी महाअभिषेख करून देवाजवळ आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या आहेत. अशा लाखो कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस यांच्या पाठीशी असून याचं भावनांचे फलित म्हणून लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटून फडणवीसच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील, असा विश्वास आ.सौ स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.