गडचिरोली: नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या मेळाव्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद

पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली असून, ही लढाई आरपारची होण्याची शक्यता आहे.

Updated: May 4, 2018, 01:11 PM IST
गडचिरोली: नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या मेळाव्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद title=

गडचिरोली : पोलिसांनी मोठी कारवाई करत काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांना जोरदार तडाखा दिला. त्यानंतर आता गडचिरोली पोलिसांनी चकमक झालेल्या बोरिया गावात हळुवार फुंकर मारलीय. ४० नक्षली टिपलेल्या या गावात पोलिसांनी एका मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यात आसपासच्या ५ गावातील नागरिक सहभागी झाले होते. नक्षली दहशत संपताच गावाने आपल्या पिण्याच्या पाण्याची ज्वलंत समस्या पुढे रेटली आणि पोलिसांनी जलद प्रतिसाद देत अवघ्या १२ तासात गावात बोरवेल खोदून पंप बसवून पाणीपुरवठा सुरू केला. या निमित्ताने गावातील गरजून आदिवासींना विविध दैनंदिन वस्तूचं वाटपही करण्यात आलं. आगामी काळात या गावात अनेक विकासकामं राबविण्याची गरजही व्यक्त झाली.

नक्षलींचा मोडला कणा

दरम्यान, नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी आणि ऐतिहासिक ऑपरेशन गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम इंद्रावती नदी परिसरात राबविले होते.  भामरागड तालुक्यातील बोरिया जंगलात १-२ नव्हे तर तब्बल ३१हून अधिक नक्षली टीपले. गडचिरोलीच्या दूर्गम जंगलात नक्षलवादी आणि सी-६०जवानांमध्ये धुमश्चक्री झाली. दीर्घकाळ गोळीबार झाला. झी २४तासच्या टीमने या स्थळाला भेट दिली तेव्हा, नदीच्या पात्रात आणि कडेला चकमकीच्या खुणा स्पष्टपणे नजरेस पडल्या. या भागातील शेकडो झाडांवर गोळ्या लागल्याच्या खुणा ताज्या होत्या. तर काही ठिकाणी रक्ताचे थारोळेही. अत्यंत खडतर परिस्थितीत राहून सी-६० कमांडोंनी नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. मोठ्या कमांडर्सच्या मुक्कामाची जागा, जेवण बनविण्याची जागा, स्नान आणि कपडे धुण्याची जागा आणि तळातील समूहाच्या इतर सदस्यांची जागा झी २४ तासच्या टीमला दिसली. या सर्वांशी संबंधित वस्तू चकमकीच्या कल्लोळात उधळून गेलेल्या स्पष्ट नजरेस पडल्या.

आरपारची लढाई होण्याची शक्यता

पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू केली असून, ही लढाई आरपारची होण्याची शक्यता आहे.