मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक सरकारला इशारा, पहा काय म्हणाले?

मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी 'यांच्या पोटदुखीचा इलाज करायला हवा' असा इशारा दिलाय.   

Updated: Apr 2, 2022, 01:36 PM IST
मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा कर्नाटक सरकारला इशारा, पहा काय म्हणाले?  title=

मुंबई : मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन झाले. गिरगाव येथील जवाहर बालभवन जवळच हे मराठी भाषा भवन उभे रहात आहे. आपण जे करतोय, ते जगातील सर्वोत्तम असायला हवे. हे भवन बघायला जगातून लोक आले पाहिजेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

मातृभाषेचे मंदिर उभे राहतंय याचा आनंद आहे. मराठी सक्तीचे शिकवावे. मराठी पाट्या लावावेत यासाठी कायदा करावा लागतो. इंग्रजी शाळेत व घरात मराठी असावे. कारभाराची भाषा ही मराठीच असायला हवी. मराठी भाषा तेजाने तळपत राहिली पाहिजे, असे ते म्हणाले.

मुंबईसाठी आजोबा लढले. मराठीसाठी बाळासाहेब लढले आणि या कार्यक्रमाच्या पाटीवर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव लागले, असे सांगून ते पुढे म्हणाले, राज्यात मराठी भाषेवर इतर भाषांचे आक्रमण नको. सीमाभागात मराठी लोकांवर भाषिक अत्याचार होतोय. यांच्या पोटदुखीचा आता इलाज करायला हवा. मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याला धडा शिकवला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना, मराठी स्वाभीमान जागृत ठेवण्यासाठी हे भवन काम करेल. मराठी भाषा संपणार नाही. मराठी माणूस जगात कुठेही गेला तरी घरात मात्र मराठीतच बोलतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा. यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

भूषण गगराणी हे मराठीतून आएएएस झालेत. ते ही देशात तिसऱ्या क्रमांकाने. मराठी मुलांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी. मुंबईत दोन मराठी माणसं मराठीत बोलताना न्यूनगंड बाळगता. मात्र, असा न्यूनगंड कुणीही बाळगू नये. प्रमाण भाषेचा आग्रह न धरता प्रवाही भाषाही महत्वाची असल्याचे ते म्हणाले. 

उद्धवजींची भाषा ही गुदगुल्या करणारी व शालजोडीतली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा मवाळ असली तरी ती गुदगुल्या करणारी आहे. कधी काही त्यांच्या भाषेतून शालजोडीही बसतात. डॉ. विश्वजीत कदम हे घरच्याच विद्यापीठातून डॉक्टर झालेत. त्यांच्यापुढे विद्यावाचस्पती विश्वजीत कदम असं लावायला हवं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.