मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत!

 पंतप्रधान मोदी  (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत. 

Updated: Nov 28, 2020, 01:09 PM IST
मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदी यांच्या स्वागताला पुण्यात जाणार नाहीत! title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) आज पुण्यात येणार आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात (Pune) उपस्थित राहणार नाहीत. शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचे स्वागत करायला मुख्यमंत्री हजर असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या स्वागतासाठी पाठवणार आहेत. शिवसेनेचे (Shiv Sena) भाजपबरोबर (BJP) बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जाणार नसल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. 

मोदी आज देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना (Covid-19) प्रतिबंधक लसीच्या (Coronavirus vaccine) संशोधन कार्याचा आढावा घेणार आहेत. अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याला मोदी या निमित्तानं धावती भेट देणार आहेत. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला (Serum Institute) मोदी दुपारी भेट देणार आहेत. तिथे ते कोरोना प्रतिबंधक (Coronavirus ) लसीवर सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत. 

त्या आधी सकाळी मोदी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क कंपनीला भेट देतील. अहमदाबादमधल्या चांगोदर औद्योगिक क्षेत्रातल्या झायडस कॅडिलाच्या प्रकल्पाला सकाळी साडे नऊ वाजता भेट देणार आहेत. तिथे ते सुमारे तासभर असतील. 

झायडसची झायकोविड लसीची दुसऱ्या टप्प्यातली चाचणी सध्या सुरू आहे. त्यानंतर मोदी हैदराबादमधल्या भारत बायोटेकला दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला भेट देतील. भारत बायोटेकनं तयार केलेल्या लसीची सध्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणी सुरू आहे. या ठिकाणी तासभर थांबून, मोदी पुण्याला येतील. पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटला ते दुपारी ४ वाजून २५ मिनिटांनी भेट देणार आहेत. मोदी या ठिकाणी एक तास असतील. त्यानंतर ते दिल्लीला परततील.