Girish Bapat Passed Away : पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, अनेक मान्यवरांची बापट यांना श्रद्धांजली

Girish Bapat Tribute : खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले आहे. पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपले आहे, अशी शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 

Updated: Mar 29, 2023, 01:52 PM IST
Girish Bapat Passed Away : पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं, अनेक मान्यवरांची बापट यांना  श्रद्धांजली title=

Girish Bapat Tribute : खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले आहे. पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपले आहे, अशी शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार, खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला होता. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरवल्याचे सांगत अनेक मान्यवरांनी आपली  श्रद्धांजली वाहिली.

समावेशक नेतृत्व हरपले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.  दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती.  त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरु केली होती. आमदार, खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हटले.

आम्ही सुहृदय मित्र गमावला - अजित पवार  

गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे. महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाह्यलं जायचं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातलं त्यांच योगदान कायम स्मरणात राहील. गिरीशभाऊंच्या निधनानं पुणे जिल्ह्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं हरपलं आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - फडणवीस

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली.

'भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके'

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. आम्ही आधार गमावला. त्यांना आम्ही भाऊ" म्हणून हाक द्यायचो आणि ते मोठ्या भावासारखे धावून यायचे. भाऊंच्या जाण्याने आम्ही पोरके झालो. मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे ; ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी श्रद्धांजली भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाहिली आहे.