'अडीच महिन्यांपूर्वी आम्ही फटाके फोडले, काहीजण आजही त्याचे डेसिबल मोजतायत', मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला  

Updated: Oct 25, 2022, 05:23 PM IST
'अडीच महिन्यांपूर्वी आम्ही फटाके फोडले, काहीजण आजही त्याचे डेसिबल मोजतायत', मुख्यमंत्री title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली : अडीच महिन्यांपूर्वी आम्ही देखील काही फटाके फोडले, त्याचे डेसिबल आजही काही मंडळी मोजत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गडचिरोली  (Gadchiroli) जिल्हा दौऱ्यावर असून अतिदुर्गम भामरागड (Bhamragarh) तालुक्यातील धोडराज इथं त्यांनी जवानांसोबत दिवाळी  (Diwali 2022) साजरी केली. यावेळी त्यांनी धोडराज पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचंही उद्घाटन केलं.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षल संवेदनशील भामरागड तालुक्यातील धोडराज इथं जवानांसोबत दिवाळी कार्यक्रमात सहभाग घेतला. मुख्यमंत्री शिंदे सकाळी नागपूरात पोहोचले. तिथून त्यांनी हेलिकॉप्टरने धोडराज गाठलं.  या ठिकाणी पोलीस जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धोडराज पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन देखील करण्यात आले

दिवाळीचा सण उत्साहात सुरुआहे, पण आम्ही अडीच महिन्यांपूर्वी फटाके फोडले होते त्याचे डेसिबल काही मंडळी आजही मोजत आहे असा टोला यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. नव्या प्रशासकीय इमारतीतून स्थानिकांच्या समस्या सोडवणुकीसाठी प्राधान्याने कार्य करा असं आवाहन त्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांना केलं. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या दौऱ्यात धोडराज इथल्या स्थानिकांशी देखील संवाद साधला. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी दुसऱ्यांदा गडचिरोलीला भेट दिली आहे. तर राज्याच्या प्रमुखांनी अतिदुर्गम नक्षली संवेदनशील क्षेत्रातील अतिदुर्गम पोलीस ठाण्यात पोहोचून पोचून दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे