शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि... वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला

 मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला हजेरी लावत वारकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

Updated: Jan 2, 2024, 05:17 PM IST
शेतकरी आत्महत्या करतात तिथे हरिनाम सप्ताह घ्या आणि... वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला title=

CM Eknath Shinde : राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वारकऱ्यांची मदत घेणार आहे. तशा प्रकारचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मलंगगडाच्या पायथ्याशी राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला उपस्थिती लावली.  शेतकरी आत्महत्या करत असलेल्या भागात हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्या असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकऱ्यांना दिला आहे. 

2 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात  राजस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या  महोत्सवाला प्रमुख उपस्थिती लावली. या महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्या प्रसंगी अश्व रिंगण पार पडले त्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणले होते. भव्य अश्व रिंगण सोहळा हे या दिंडीचे मुख्य आकर्षण होते. यावेळी रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

यावेळी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगड मुक्तीची जी तुमची भावना आहे ती पूर्ण केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे आश्वासन  दिले. तसेच वारकऱ्यांना त्यांनी विनंती केली की राज्यात वारकरी संप्रदाय हा समाज प्रबोधन करतो. मात्र, ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहे. तिथे असे हरिनाम सप्ताह घेऊन त्यांना प्रवचन द्यावे अशी विनंती यावेळी भाषणातून त्यांनी केली.

नाशिकमधील  874 गावं दुष्काळी नुकसान भरपाईपासून वंचित 

नाशिक जिल्ह्याच्या सात तालुक्यातील 874 गावं दुष्काळी नुकसान भरपाईपासून वंचित आहे. दुष्काळी परिस्थितीत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पैसेवारी ही अत्यंत महत्त्वाची असते. मात्र अशाच परिस्थितीत मदत जाहीर न केल्यानं शासनाच्या अनेक योजनांपासून शेतकरी वंचित आहे.

चंद्रपुरात चांदा ॲग्रो – 2024 महोत्सव

3 ते 7 जानेवारी दरम्यान चंद्रपुरात चांदा ॲग्रो – 2024 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 3 ते 7 जानेवारी दरम्यान चांदा क्लब ग्राऊंडवर चांदा ॲग्रो – 2024 चे आयोजन करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थान यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते 3 जानेवारी रोजी होणार आहे.  या कृषी महोत्सवात शेतीविषयक तंत्रज्ञानासोबतच पशु प्रदर्शनी, चर्चा व परिसंवाद, तृणधान्य खिचडी महोत्सव, धान्य महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रमासह नोंदणी केलेल्या शेतक-यांसाठी शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षिसांची मेजवानी राहणार आहे. कृषी विषयक प्रदर्शन व शासकीय योजना शेतक-यांपर्यंत पोहचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार विपणन साखळी सक्षम करणे, समुह / गट स्थापित करून शेतकरी उत्पादन कंपन्यांचे सक्षमीकरण करणे, कृषी विषयक शेतकरी संवाद आयोजित करून शेतक-यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता ते ग्राहक संमेलनाचे आयोजन करून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास चालना देणे या उद्देशाने जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर येथील जिल्हा कृषी महोत्सवात 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये नाशिक येथे भगरीपासून 6000 किलोग्रॅमची खिचडी बनवून इंडिया बुक व आशिया बुकमध्ये नोंद करण्यात आली होती. चंद्रपूर नगरीत जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र मिलेट महोत्सव अंतर्गत बाजरीचा वापर करून 6750 किलोग्रॅमची खिचडी तयार करण्यात येणार आहे.