शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शन

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: महाराष्ट्रातील 3 सदस्यांची एक टीम 2023 साली सप्टेंबर महिन्यात ही वाघनखं आणण्यासाठी ब्रिटन दौऱ्यावर गेली होती.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 17, 2024, 12:07 PM IST
शिवरायांची वाघनखं ब्रिटनवरुन महाराष्ट्रात आणण्याची तारीख जाहीर; 'इथं' मिळणार वाघनखांचं दर्शन title=
सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्रातील एका टीमने यासाठी केलेला ब्रिटनचा दौरा

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha In Maharashtra: संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सर्व शिवप्रेमी ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते ती घोषणा अखेर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांच्या मदतीने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखं पुढल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात भारतात आणली जाणार आहेत. ही वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.

कधी आणली जाणार ही वाघनखं?

समोर आलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवरायांची ही वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. म्हणजेच 1 जुलै ते 7 जुलैच्या तारखेदरम्यान ही वाघनखं भारतात दाखल होणार आहेत. जुलैपासून पुढील दहा महिने म्हणजेच 2025 च्या मे महिन्यापर्यंत ही वाघनखं या संग्रहालयात प्रद्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.

महाराष्ट्रातून या तीन व्यक्ती वाघनखं परत आणायला गेलेल्या

2023 मध्ये ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनखं मायदेशी परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम 29 सप्टेंबरला लंडनला गेली होती. वाघनखं परत आणण्यासाठी तीन जणांची जी टीम लंडनला गेली होती त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश होता.

50 लाखांचा खर्च

याच दौऱ्यादरम्यान हा ऐतिहासिक, अमूल्य ठेवा मुंबईत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रिटनसोबत सामंजस्य करार केला. वाघनखं पुन्हा भारतात आणण्यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ब्रिटिश प्रशासनाने वाघनखं भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. 1824 मध्ये ही वाघनखं ब्रिटनला नेण्यात आली होती. त्यानंतर आता शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसाचा ठेवा महाराष्ट्रात आणला जावा, अशी मागणी केली जात होती. आता खरोखरच असंख्य शिवप्रेमींचं हे स्वप्न सत्यात अवतरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला 'याची देह, याची डोळा' महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा सांगणारी ही वाघनखं पाहता येणार आहेत.

एकूण चार संग्रहालयात ही वाघनखं ठेवण्याची योजना

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं राज्यातील 4 वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरमधील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी ही वाघनखं पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. ही वाघनखं केवळ 3 वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून तीन वर्षांनी ती पुन्हा ब्रिटनला पाठवली जाणार आहेत.

नियोजनासाठी 11 सदस्यांची समिती

लंडनवरुन ही वाघनखं राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारने 11 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाघनखं सुरक्षितपणे राज्यात आणण्याची जबाबदारी या 11 सदस्यांवर असणार आहे. तसेच राज्यामधील 4 संग्रहालयांमध्ये ही वाघनखं कधी, कुठे आणि कशी सर्वसामान्यांना पाहता येतील यासंदर्भातील सविस्तर नियोजन करण्याचं कामही याच 11 जणांकडे सोपवण्यात आलं आहे. 

वाघनखं लंडनला कशी गेली?

शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक असलेली वाघनखं ही महाराजांच्या साताऱ्याच्या वारसदारांकडं  होती. 1818 पर्यंत इंग्रजांनी संपूर्ण भारत खंगाळून टाकला होता. 1818 मध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटीश अधिकारी जेम्स ग्रँड डफ राजकीय हस्तक म्हणून साताऱ्याला काम करत होता. महाराजांचे तत्कालीन वारसदार प्रतापसिंह महाराजांनी ही वाघनखं डफला भेट दिली. डफने सातारा येथे 1818 ते 1824 या काळात काम केलं. 1824 मध्ये डफ वाघनखं घेऊन ब्रिटनला परतला. मात्र, डफच्या वारसदारांनी ही वाघनखं लंडनच्या म्युझियममध्ये ठेवायला दिली.