चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सुरु असलेल्या दारूबंदीच्या समिक्षेसाठी समिती नेमण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. नियोजन भवनातील आढावा बैठकीत वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तोंडी निर्देश दिले. त्यानुसार लवकरच ५ सदस्यांची आढावा समिती तयार करण्यात येणार आहे. चंद्रपुरातील दारूबंदी उठवावी की कसे, याबाबत ही समीक्षा समिती निर्णय घेईल. पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवण्याचे संकेत दिले होते.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली तरी अवैध मार्गाने दारू विक्री सुरुच राहिली, त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल तर बुडालाच, शिवाय दारूबंदीचा उद्देशही साध्य झाला नाही. दारुबंदीमुळे गेल्या पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात २०० कोटी रुपयांचा महसूल बुडाला.
महसूल वाढीसाठी सरकारला दारुबंदी हटवण्याची भूमिका घ्यावी लागेल, असे चंद्रपूरमधील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी म्हटले होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या महसुलवाढीचे पर्याय शोधण्यासाठी काही विभागांची बैठक घेतली होती. त्यावेळी बंदी लागू होऊनही चंद्रपुरातील दारुविक्री थांबली नसल्याची बाब उत्पादन शुल्क विभागाकडून मांडण्यात आली. यावेळी अवैध दारुविक्रीत झालेली वाढ आणि करचोरीला आळा घालण्यासंदर्भातही चर्चा झाली. उलट या बंदीमुळे महसूल बुडून राज्याचे नुकसान होत असल्याचा सूर अनेकांनी लावला.