'अजित पवारांच्या त्या फाईल्स भाजपनं क्लियर केलेल्या नाहीत'

 ज्या केसेस मागे घेतल्या, त्याचा अजित पवारांशी संबंध नसल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

Updated: Dec 8, 2019, 06:58 PM IST
'अजित पवारांच्या त्या फाईल्स भाजपनं क्लियर केलेल्या नाहीत' title=

मुंबई : अजित पवारांना भाजपनं क्लिनचिट दिलेली नाही. ज्या केसेस मागे घेतल्या, त्याचा अजित पवारांशी संबंध नसल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अजित पवार दोषी असल्याचा आरोप असलेल्या कुठल्याही फाईल भाजपनं क्लियर केलेल्या नाहीत. नव्या सरकारने तसं केलंय का माहिती नाही असेही पाटील म्हणाले. त्यामुळे भाजपसोबत राहुन दोन दिवसाचे उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांवर टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपच्या मुंबई विभागाची बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. विभागनिहाय बैठका घेतल्या गेल्या. तशी आज मुंबई विभागाची बैठक घेतल्याचे ते म्हणाले. २०२२ ची मुंबई महापालिका स्वत:च्या ताकदीवर जिंकेल आणि भाजपचा महापौर होईल असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळं मुंबईवर अधिक लक्ष दिल्याचे ते म्हणाले. 

३० डिसेंबरपर्यंत मुंबई अध्यक्षाची तसेच संघटना सोयीसाठी आम्ही ६५ जिल्हे केले असून तिथंही जिल्हाध्यक्ष निवड होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

नाथाभाऊ आमचेच 

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लोकसभा निवडणुकी आधीपासूनच पक्षावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी पक्षश्रेष्ठींकडे बोलूनही दाखवली आहे. ते भाजप सोडणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावरही चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिय दिली. नाथाभाऊ हे ७८-७९ पासून भाजपमध्ये काम करत आलेत. जी भाजपची ताकद वाढलीय त्यात अनेकांबरोबर नाथाभाऊंचेही योगदान आहे. ते आमचे नेते आहेत. ते असा विचार करणार नाहीत. रागावण्यासारख्या भावना निर्माण झाल्या. त्यांचे काल सर्व काही ऐकले असल्याचे पाटील म्हणाले. आपण जयंत पाटील काय बाेलतात, त्याकडं लक्ष देत नसल्याचेही ते म्हणाले. 

राज्य सरकार मंत्रीमंडळ विस्तारावर चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आले. माझ्या बापानं स्वत:च्या संसाराचं बघायला सांगितलंय, दुसऱ्याच्या संसारात काय चाललंय ते मी बघत नाही असे ते म्हणाले.