Central Railway: दिवाळीच्या सुट्टीत नोकरदार वर्गाला गावी जाण्याचे वेध लागतात. रेल्वेने नोकरदार वर्गासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे लांब पल्ल्याच्या 583 गाड्या सोडणार आहेत. यात आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने या विशेष गाड्या सोडल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर विभागातून उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपुर, आसनसोल, आगरतळा, संत्रागाछी या भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वातानुकूलित, शयनयानासह अनारक्षित मिश्र व्यवस्था असलेल्या गाड्यांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वेने गेल्यावर्षी या कालावधीत एकूण ४,५०० सेवा चालविल्या होत्या. यावर्षी तोच आकडा ७,२९६ वर पोहोचला आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते भारताच्या विविध भागांमधून वर्षातील 300 ते 320 दिवस बहुसंख्य प्रवासी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा भागांमध्ये कामानिमित्त येत असतात. दिवाळी व छटपूजा अशा सणानिमित्त ३० ते ४० दिवसांच्या कालावधीत हे प्रवासी मुंबई आणि इतर भागांतून त्यांच्या स्वगृही परततात.
महाराष्ट्रातील लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उत्सव विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. तर दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी करीमनगर, कोचुवेली, काझीपेट, बेंगळूरू आणि इतर ठिकाणांसारख्या विविध ठिकाणी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.
रेल्वेने प्रवाशांसाठी काही उपाययोजनादेखील आखल्या आहेत. महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मे आय हेल्प यू बूथ उभारण्यात आले आहेत. विविध स्थानकांवर तिकिट काउंटरची संख्या वाढवण्यात आली आहे. तर प्रमुख स्थानकांवर प्रवासी होल्डिंग एरिया अतिरिक्त आरपीएफ कर्मचारी आणि तिकिट तपासणीस तैनात करण्यात आली आहे.
रेल्वेच्या डब्यातील गर्दी व वर्दळ रोखण्यासाठी आता नियमापेक्षा अधिक सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रश्चिम रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने त्यांच्या प्रत्येक प्रवाशांसाठी प्रवास करताना विशिष्ट प्रमाणात सामान घेऊन जाण्याची परवानगी देते. पण 100x100x70 सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि 75 किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी डब्यातून नेल्यास प्रवाशांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.