आता कन्फर्म तिकिट मिळणारच! दिवाळीसाठी मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Central Railway Special Trains: मध्य रेल्वेने दिवाळीसाठी काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा कुठून सुटणार या गाड्या   

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 21, 2024, 10:25 AM IST
आता कन्फर्म तिकिट मिळणारच! दिवाळीसाठी मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय title=
central railway 132 special trains will run from mumbai for diwali

Central Railway Special Trains: दिवाळीच्या निमित्ताने अनेक जण नातेवाईंकाकडे किंवा त्यांच्या मुळ गावी जात असतात. त्यामुळं बस स्थानक, रेल्वे स्थानकांत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी उसळते. हीच वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई,पुणे आणि नागपूर येथून देशाच्या विविध भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या 570 विशेष सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मुळं प्रवाशांना आता कन्फर्म तिकिट मिळणे सहज शक्य होणार आहे. 

मध्य रेल्वे एकूण 570 रेल्वे फेऱ्या चालवणार आहे. एकूण सेवांपैकी 42 सेवा शनिवारपर्यंत पूर्ण झाल्या आहेत. यासर्व सेवा 85 एक्स्प्रेस गाड्यांद्वारे दिल्या जाणार आहेत. वातानुकुलित विशेष, वातानुकूलित शयनयान आणि जनरल डब्यांच्या मिश्र डबे असलेल्या अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 

मध्य रेल्वेने आता 570 रेल्वे गाड्या सोडणार असून त्यातील 180 गाड्या राज्यात धावणार आहेत. लातूर, सावंतवाडी रोड, नागपूर, पुणे, कोल्हापूर, नांदेड आणि इतर ठिकाणाहून धावणार आहेत. तर, 378 सेवा या उत्तर भारतातील दानापूर, गोरखपूर, छपरा, बनारस, समस्तीपूर, आसनसोल, आगरतळ, संत्रागाछी या विविध भागातील प्रवाशांसाठी आहेत. 

इतर राज्यात धावणाऱ्या गाड्यांपैकी 132 सेवा मुंबईतून आणि 146 सेवा पुण्यातून व उर्वरित 100 सेवा इतर ठिकाणाहून चालवण्यात येणार आहेत. याशिवाय, दक्षिण भारतातील प्रवाशांसाठी 84 विशेष गाड्या चालवल्या जात आहेत, ज्या करीमनगर, कोचुवेली, काझीपेट आणि बेंगळुरूपर्यंत धावणार आहेत. या विशेष गाड्यांसाठी प्रवासी आगाऊ बुकिंग करू शकतात. तपशीलवार माहिती आणि इतर माहितीसाठी रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲपवरून माहिती मिळवता येईल.