केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप 

Updated: Apr 28, 2021, 12:45 PM IST
केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सीजन तुटवड्याला कारणीभूत - पृथ्वीराज चव्हाण title=

कराड : केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले. वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) असल्याचे ऑक्टोबरमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सांगितले. पण प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना "भारताने कोरोनाला कसे हरवले" असे सांगत स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता अंगलट येत असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला. 

जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत.  आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत न घेतलेल्या निर्णयांमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

ज्यांचे नातेवाईक ऑक्सीजनअभावी मृत्युमुखी पडले त्यांना उत्तरे हवी आहेत. देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

सरकारने अतिरिक्त 1 लाख MT ऑक्सिजन आयात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे सांगितले. पण मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही. त्यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दवाखाने आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे मिनिटा-मिनिटाला हताश फोन येत आहेत. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या बातम्या देशभरातून येत आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागत आहे. हे अत्यंत विदारक चित्र असल्याचे चव्हाण म्हणाले. 
 
ऑक्सीजनच्या पुरवठ्याबाबत “आपण अत्यंत सुस्थितीत (extremely comfortable) आहोत "  हा दावा आरोग्य मंत्रालयाने कशाच्या आधारावर केला होता?  1 लाख मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सीजन आयातीचे काय झाले ? 5 महिन्यात ते का आयात केले नाही ?  ही प्रक्रिया कोणी थांबवली?  तसेच आतापर्यत देशभरात मंजूर केलेल्या 162 PSA पद्धतीचे ऑक्सीजन निर्मिती प्लॅन्ट पैकी फक्त 33 दवाखान्यातच उभा केले आहेत, हे खरे आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.