Maharashtra Shikshak Bharti 2023: अखेर शिक्षक भरतीची तारीख ठरली आहे. दहा जिल्हा परिषदांच्या शिक्षक विभागाची बिंदुनामावली अंतिम झाली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांना बिंदुनामावली तत्काळ मागासवर्गीय कक्षाला पाठविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे सहा वर्षांच्या शिक्षक भरतीची प्रतीक्षा आता संपणार आहे. 5 सप्टेंबरपूर्वी राज्यातील शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल उघडलं जाणार आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणत: 23 हजार शिक्षकांची भरती होईल. अनेक जिल्ह्यात ओपन आरक्षण शिल्लक राहिलं नव्हतं त्यामुळे त्याची चौकशी करून कुठल्या आरक्षणांतून कुठला शिक्षक घेतला याची खात्री करून आरक्षणात टाकलं जाणार असल्याचं शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले.
राज्यात जवळपास 62 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यात जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे. भरती प्रक्रियेत 50 टक्के पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे शासन स्तरावर केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंतीक्रमानुसार जिल्ह्यांची निवड करता येणार आहे. गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. खासगी अनुदानित संस्थांना तसेच शाळांना रिक्तपदांची जाहिरात ‘पवित्र’वर प्रसिद्ध करावी लागणार आहे. मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.