बुलडाण्यात विद्यार्थ्याला समज देणे महाग, पालकांनी प्राचार्याला वर्गातच तुडवले

शाळा सुरु असतांना सिनेमा स्टाइलने वर्गात घुसून शिकवत असलेल्या प्राचार्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.  

Updated: Aug 11, 2018, 11:20 PM IST
बुलडाण्यात विद्यार्थ्याला समज देणे महाग, पालकांनी प्राचार्याला वर्गातच तुडवले title=

बुलडाणा : शाळा सुरु असतांना सिनेमा स्टाइलने वर्गात घुसून शिकवत असलेल्या प्राचार्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार वर्गात लावलेल्या सीसीटीव्ही केमेऱ्यामध्ये कैद झालाय. चिखली येथील तक्षशीला माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयातील ही घटना असून याप्रकरणी विदयार्थ्यांच्या पालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आलाय. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्राचार्य सुनील वळसे हे वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत होते. बुधवारी दुपारी जेवणाच्या सुटीमध्ये इयत्ता १० वीच्या कृष्णा मंजुळकर या विद्यार्थ्याचे आणि इयत्ता ७ वीमधील शेख आदील शेख आहत यांच्यात भांडण झाले होते. याचा राग मनात ठेऊन शेख आदील शेखने शाळेबाहेरील ४ ते ५ मुले आणून कृष्णा मंजुळकरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे कृष्णा मंजुळकरने प्राचार्य वळसे यांना घडलेला प्रकार सांगितला असता प्राचार्यानी शेख आदीलला बोलावून घेतले आणि समज देत असे न करण्याबाबत बजावले.

मात्र त्याचा राग मनात धरून शेख आदिलने घरी जाऊन आपल्या वडिलांना प्राचार्यांनी त्याला मारल्याचे सांगितले. प्राचार्य सुनील वळसे हे तास घेत असतांना शेख या विद्यार्थ्यांचे वडील ४ ते ५ जणांना घेऊन शाळेत शिरले आणि वर्गात जाऊन प्राचार्य सुनील वळसे यांना लाथा बुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.