विधवा वहिनीला दिली जगण्याची 'आशा'; दिरानेच लग्न समाजापुढं ठेवला आदर्श

राज्यात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागातही विधवा प्रथा बंदीला सुरुवात झालेली आहे. असाच एक प्रकार सोलापूरच्या करमाळामध्ये घडला आहे. एका दिराने आपल्या विधवा वहिनीसोबतच लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे देशमाने कुटुंबाने एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. 

Updated: Jun 2, 2022, 11:19 AM IST
विधवा वहिनीला दिली जगण्याची 'आशा'; दिरानेच लग्न समाजापुढं ठेवला आदर्श  title=

सचिन कसबे, झी मीडिया, सोलापूर : राज्यात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. ग्रामीण भागातही विधवा प्रथा बंदीला सुरुवात झालेली आहे. असाच एक प्रकार सोलापूरच्या करमाळामध्ये घडला आहे. एका दिराने आपल्या विधवा वहिनीसोबतच लगीनगाठ बांधली आहे. त्यामुळे देशमाने कुटुंबाने एक आदर्श समाजापुढे ठेवला आहे. 

सुखी संसारात पत्नीने अचानक सोडली साथ - 

करमाळामधील बालाजी नगरमध्ये संतोष देशमाने आणि आशा देशमाने यांचा 10 वर्षांपूर्वी विवाह झाला. मात्र त्यांना मूल बाळ नव्हतं. या कारणाने त्यांच्यामध्ये कधी वाद सुद्ध झालेला नाही. मात्र पती संतोषचा अकस्मातपणे मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूमुळे आशा देशमाने या एकट्या पडल्या होत्या. तसेच देशमाने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. 

पतीच्या जाण्याने पत्नी दु:खी, सासरेही नाराज - 

सुखी संसारात पतीने अचानकपणे साथ सोडल्यामुळे पत्नी आशा दु:खी होती. पतीला जाऊन 6 महिने उलटले होते. मात्र सून दु:खातून अजूनही सावरली नसल्याचे सासऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपला मुलगा स्वप्नील देशमाने याच्याशी सूनेचा पुर्नविवाह करण्याचा विचार सासऱ्यांच्या मनात आला. 

सासऱ्यांनी स्वप्नीलशी याबाबत बातचीत केली. त्यावर स्वप्नीलने संमती दर्शवली. सून आशाशी सुद्धा सासऱ्यांचं यासंदर्भात बोलणं झालं. दोघांनीही लग्नाला होकार दिल्यामुळे त्यांचं लग्न लावण्याची तयारीला सुरुवात झाली. 

संतोषचा मोठा स्वप्नीलशी लग्न - 

संतोष हा धाकटा भाऊ आणि स्वप्नील हा मोठा होता. संतोषने लग्न केलं पण स्वप्नीलचं लग्न झालं नाही. करमाळामध्येच स्वप्नीलचं किराणा मालाचं दुकान आहे. आशा आणि स्वप्नीलचं लग्न लावण्यावरुन देशमाने कुटुंबात चर्चा झाली. समाजाला न रुचणारी गोष्ट असल्यामुळे सुरुवातीला देशमाने कुटुंबाला पटत नव्हते. पण दोघांच्या भविष्याचा विचार करत कुटुंबाने सुद्धा लग्नाला हिरवा कंदील दाखवला.  

करमाळामध्ये समाजाला आदर्श देणारा आणि विधवा प्रथेवर बंदी घालण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. स्वप्नील आणि आशा यांनी आपल्या नव्या संसार जीवनाची सुरुवात कुटुंबियांच्या साक्षीने केली.