प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : अलिबागमध्ये दुर्घटना घडली आहे. अलिबाग-मुरूड मार्गावर काशीद येथील नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली आहे. दुर्घटनेत एक कार आणि बाईक अडकल्याचं समजतंय. दुर्घटनेत काही जण किरकोळ जख्मी असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु केलं गेलं आहे. ( bridge at Kashid on Alibag Murud Road collapsed)
या दुर्घटनेत एकूण 6 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीला किरकोळ जख्मी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून मुरुडकडे जाणारी वाहतूक ही रोहा सुपेगाव मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलंय.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना?
अलिबाग-साळाव-मुरुड मार्गावर काशिद बीच ते काशिद दरम्यान हा पूल आहे. हा पूल जवळपास 50 वर्ष जूना आहे. या पूलाची गेल्या काही वर्षांपासून दुरावस्था झाली होती. तसेच स्लॅब खचण्याचीही भिती व्यक्त केली जात होती. यामुळे ग्रामस्थ तसेच वाहनचालकांकडून या पूलाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र त्यांनतरही याकडे जबाबदार अधिकाऱ्यांनी काना डोळा केला अन अखेर ज्याची भिती होती तेच घडलं.