Breaking | 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबत मोठी बातमी; शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर

SSC / HSC Exam Date : राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे

Updated: Feb 3, 2022, 12:25 PM IST
Breaking | 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबत मोठी बातमी; शिक्षण मंडळाकडून तारखा जाहीर title=

पुणे  : SSC / HSC Exam Date : राज्यातील 10 वी 12 वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. 12 वी च्या परीक्षा 4 ते 30 मार्च तर 10 वी 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होणार असून दोन वर्ष कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखन वेग कमी झाला आहे. हे लक्षात घेता परीक्षेसाठी अर्धात तास जादा वेळ देण्यात आला आहे. राज्यात बारावी परीक्षांसाठी १४,७२,५६४ तर दहावीच्या परीक्षांसाठी १६,२५,३११ आवेदन पत्र प्राप्त झाली आहेत. अशी माहितीमहाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

 

जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ शकले नाहीत. ते विद्यार्थी लेखी परीक्षेनंतर ही परीक्षा देऊ शकणार आहेत. ५ एप्रिल ते २२ एप्रिल या काळात या परीक्षा होणार आहेत. १२वी साठी एकूण १५८ विषयांसाठी ३५६ प्रश्नपत्रिका आणि १० वीच्या ६० विषयांसाठी १५८ प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. 

शिक्षण मंडळाने ऑफलाईन परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. यासाठी पावणे दोन लाख कर्मचारी झटत आहेत. कोरोनाचा विचार करून आवश्यक काळजी घेतली जात असून झिग झॅक पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. जेथे शाळा तेथेच परीक्षा होणार आहे. यामुळे मुलांच्या मनातील भीती कमी होईल. त्यांना चांगले वातावरण मिळेल, असे शरद गोसावी यांनी सांगितले.

सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होणार आहे. तर, मुलांना १०.२० वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. तर, दुपारच्या सत्राची परीक्षा २.३० वाजता सुरु होईल आणि मुलांना प्रश्नपत्रिका २.२० वाजता देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने अर्धा तासाचा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.