आंबेनळी घाटात दोन्‍ही बाजूची वाहतूक बंद

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.

Updated: Jul 29, 2018, 10:54 AM IST
आंबेनळी घाटात दोन्‍ही बाजूची वाहतूक बंद  title=

रायगड: आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर त्‍या ठिकाणी मृतदेह बाहेर काढण्‍याचे काम सुरू आहे. या कामात अडथळे येऊ नये यासाठी आंबेनळी घाटातून होणारी दोन्‍ही बाजूची वाहतूक बंद करण्‍यात आलीय. या मार्गावरून एस. टी. च्‍या दिवसाला १७ फेऱ्या दोन्‍ही बाजूने होत असतात. त्‍यात मुंबई तसेच रायगडच्‍या अनेक भागातून अक्‍कलकोट, महाबळेश्‍वर, सातारा, सांगलीकडे जाणाऱ्या बसेसचा समावेश आहे. या फेऱ्या रदद झाल्‍याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय झाली. याखेरीज खाजगी प्रवासी व मालवाहतूकही बंद होती. बचावकार्य संपेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

प्रवाशांच्‍या सुरक्षेचा मुददा पुन्‍हा  ऐरणीवर

आंबेनळी घाटात शनिवारी झालेल्‍या अपघातानंतर पोलादपूर ते महाबळेश्‍वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्‍या सुरक्षेचा मुददा पुन्‍हा एकदा ऐरणीवर आलाय. दिवसभरात एस. टी. च्‍या १७ फेऱ्या या मार्गावरून सुरू असतात. अतिशय अवघड वळणाच्‍या या घाटरस्‍त्‍यावरून वाहन चालवताना कसरत करावी लागते. सुरक्षेच्‍या कोणत्‍याही उपाय योजना या घाटात नाहीत. त्‍यामुळे जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. परंतु या रस्‍त्‍याच्‍या देखभालीकडे लक्ष दिलं जात नाही अशी खंत या मार्गावरून प्रवासी वाहतूक करणारे एस. टी. चालक व्‍यक्‍त करीत आहेत. 

मृतांच्या कुटुंबियांना राज्यसरकारची ४ लाखाची मदत

दरम्यान राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी ४ लाखाची मदत करणार असल्याचे जाहीर केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली.