मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : नाशिकमध्ये अवयवदानाचा काळा बाजार होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अपघातात जखमी झालेल्या रूग्णाला अवयवदानासाठी आधीच ब्रेनडेड घोषित करण्यात आल्याचा भीषण प्रकार घडलाय. रूग्ण जिवंत असतानाही त्याला ब्रेन डेड घोषीत करण्याची घाई करणाऱ्या शहरातल्या दोन बड्या रूग्णालयांना नाशिक महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
फोटोत दिसणाऱ्या या आहेत जया जमादार.... 24 ऑगस्टला त्यांना अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. उपचारांसाठी त्यांना व्हीजन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोन तीन दिवसांच्या उपचारांनंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या मेंदू रोग तज्ज्ञांनी त्यांना ब्रेन डेड घोषीत केलं. पेशंटचा मेंदू मृत झाल्याने अवयवदान करावे असा सल्ला देऊन पुढच्या प्रक्रियेसाठी साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आल्याचा आरोप जमादार यांच्या नातेवाईकाने केलाय.
साईबाबा हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता रूग्ण ब्रेन डेड नसल्याचं आणि त्यांचा मेंदू अजूनही कमी अधिक प्रमाणात काम करत असल्याचं उघड झालं. रूग्णाच्या हृदयाला छिद्र असल्याने सर्वाधिक 'मोल' असलेल्या हृदयाचं प्रत्यारोपण होणार नाही असा निष्कर्ष काढण्यात आला. अखेर या रूग्णाला गंभीर अवस्थेत दोन ते तीन हॉस्पिटलमध्ये फिरवण्यात आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या वैद्यकीय विभागासह मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार करून अवयवदानासाठी रॅकेट काम करत असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केलीय.
या तक्रारीनंतर मनपाने व्हीजन आणि साईबाबा या दोन्ही हॉस्पिटलना नोटीस पाठवलीय. मात्र महापालिकेने नोटीस बजावली असली तरी कारवाईचा अधिकार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आता अवयवदानासाठी काम करणाऱ्या झोनल कमिटीकडे अहवाल पाठवला जाईल.
महापालिकेच्या नोटीशीनंतर साईबाबा आणि व्हीजन हॉस्पिटलचे मेंदू रोगतज्ज्ञ डॉ. संजय देसाई यांचं धाबं दणाणलं आहे. व्हीजन हॉस्पिटल आणि साईबाबा हॉस्पिटल आता एकमेकांवर याची जबाबदारी ढकलतायत
अवयवदानासाठी काही नियम रूग्णालयांना घालून देण्यात आलेत. अवयवदानासाठी मान्यताप्राप्त असलेल्या जवळच्या रूग्णालयात रूग्णाला दाखल करणं गरजेचं आहे. असं असताना साईबाबा या दूरच्या रूग्णालयात का हलवण्यात आलं. रूग्ण ब्रेन डेड घोषित करण्याची घाई का करण्यात आली असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नाशिकमधील घटनेत पुढे जाऊन अनेक रहस्य उलगडतील अशी दाट शक्यता व्यक्त होतेय.