स्पर्धेतील बहुमूल्य चित्रांचा काळाबाजार

कुंपणच खातेय चित्र, विद्यार्थी कलाकार संतप्त...

Updated: Aug 29, 2022, 08:58 AM IST
स्पर्धेतील बहुमूल्य चित्रांचा काळाबाजार title=
मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आलेल्या प्रदर्शनातील एक चित्र

योगेश खरे, नाशिक:   

चोर पैश्यांसाठी दरोडा टाकतो, दागिने, पैसे चोरी करतो मात्र पैश्यांकरिता चित्रकाराने चित्र चोरले असे म्हटले तर.... हो हे खरय... नाशिकमधील नामांकित महाविद्यालयातील विविध चित्रकारांची चित्रांचे  मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत एका चित्रचोराने स्वतःच्या नावाने प्रदर्शित केले. मात्र मूळ कलाकारांनी तक्रार करताच  हे प्रदर्शन थांबवण्यात आले. 

काय आहे प्रकरण

योगेश वालदे याने 'जहांगीर' मध्ये २३ ते २९ ऑगस्ट या कालावधीत 'दि डिव्हाइन लव्ह' हे चित्रप्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात रुपेशच्या मित्राला त्याचे चित्र दिसले. त्याने रुपेशला कळविल्यानंतर हि बाब उघड झाली. या प्रदर्शनात रूपेशसह गजानन शेळके (पुणे), स्वप्नील पाटे, प्रवीण कारंडे (मुंबई) यांची चित्रे योगेशने प्रदर्शनात स्वतःच्या नावाने लावली असल्याचा दावा चित्रकारांनी केलाय.

कोण आहे हा योगेश वालदे

योगेश वालदे हा नाशिक चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी. याच विद्यालयात रुपेश सोनार सारख्या विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षण घेतले आहे.  वालदे याची नाशिक शहरात एक आर्ट गॅलरी चालवतो.कोरोना काळात  महाविद्यालय बंद असल्याने इमारतीचे रंगकाम माजी विद्यार्थी योगेश वालदे याला देण्यात आले होते. यावेळी रंगासोबत अडगळ सामान फेकण्याचा ठेका सुद्धा योगेशला दिला होता. यात योगेशने ही चित्र नेले असल्याचा दावा महाविदयालयाने केला आहे. 

कशी होते स्पर्धा ?

८० वर्षांची परंपरा असलेल्या नाशिकमधील कलानिकेतन संस्थेच्या चित्रकला महाविद्यालयात दर वर्षी “ऑन दि स्पॉट” राज्यस्तरीय लँडस्केप स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत सहभागी आणि विजयी स्पर्धकांचे चित्र महाविद्यालयात जमा केली जातात. अशी अनेक शेकडो महत्वपूर्ण चित्रे  महाविद्यालयाच्या गोदामामध्ये ठेवण्यात येतात. यामध्ये विद्यार्थी दशेत असलेले कलाकार नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध होतात त्यामुळे महाविद्यालयाच्या ताब्यात अनेक बहुमूल्य चित्र असतात. या महाविद्यालयात गेल्या आठ दशकातील ख्यातकीर्त कलाकारांसह सध्याचे आंतरराष्ट्रीय कलाकार सावंत बंधूंसारखी कलाकारांची चित्र सुद्धा आहेत

चोराचे साथीदार कोण?

 महाविद्यालय आपल्या संग्रहातील कलाकृतीबद्दल इतके गाफील कसे राहू शकते असा सवाल विद्यार्थ्यांनी केलाय. चित्रे गायब झाल्याचे आठवडाभरापासून लक्षात येऊनही साधी पोलीस तक्रार नोंदवण्यात आलेली नाही . त्यामुळे संस्थेच्या कारभारावर संशय निर्माण झाला आहे. त्यात महाविद्यालयानेच विजेत्या चित्रकारांचे चित्र योगेशला विकले असल्याचा आरोप माजी विद्यार्थ्यांनी योगेश वालदेच्या माहितीनुसार केलाय. प्रकरण गंभीर होत असल्याचे बघताच कलनिकेतन संस्थेने मात्र हात झटकत हा व्यवहार प्राचार्य अनिल अभंगे आणि योगेश वाल्हे यांच्यामध्ये झाल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या दोघांनी ही चित्रे संगनमताने बाजारात विक्रीसाठी तर ठेवली नाहीत ना असा संशय निर्माण झाला आहे. मात्र संस्थेने अद्याप याबाबत कोणावरही कारवाई केली नसल्याने संस्थेबाबतही नाराजी व्यक्त केली जाते