२०१४ साली भाजप ब्लँकेट ओढून झोपला होता का?- संजय राऊत

२०१४ मध्ये भाजपला जे यश मिळाले होते, त्याची पुनरावृत्ती भविष्यात कधीच होणार नाही.

Updated: Dec 24, 2018, 11:45 AM IST
२०१४ साली भाजप ब्लँकेट ओढून झोपला होता का?- संजय राऊत title=

पंढरपूर: हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करून शिवसेनेशी युती करू पाहणार भाजप पक्ष २०१४ साली ब्लँकेट ओढून झोपला होता का, असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. त्यांनी सोमवारी पंढरपुरात 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपशी युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, २०१४ मध्ये शिवसेनेलाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी युती व्हावी, असे वाटत होते. मग त्यावेळी भाजप ब्लँकेट ओढून झोपला होता का? आता २०१९ मध्ये युती करून काय होणार आहे, असा सवाल राऊत यांनी भाजपला विचारला. आम्ही अजूनही २०१४ मध्ये भाजपने असे का केले, याची कारणं शोधत आहोत. तसेच भाजपशी समेट करायला आम्ही काही पासवान नाही, अशी खोचक टिप्पणीही संजय राऊत यांनी केली. 

यावेळी संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा इतके मोठे यश मिळणार नसल्याचेही सांगितले. आगामी विधानसभा ही त्रिशंकू असेल. २०१४ मध्ये भाजपला जे यश मिळाले होते, त्याची पुनरावृत्ती भविष्यात कधीच होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने राम मंदिर उभारण्याचा निर्णय आताच घेतला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.

शिवसेनेने यंदाची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला भाजप नेतृत्वाने शिवसेनेच्या या इशाऱ्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. मात्र, गेल्या काही काळात बदललेल्या परिस्थितीमुळे भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करायला सुरुवात केली आहे. या सगळ्याबद्दल शिवसेनेने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, विधानसभेसह लोकसभा निवडणुकीसाठी समसमान म्हणजे, अनुक्रमे १४४ आणि २४ जागांची मागणी शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता आहे.